मुंबई

Sharad Pawar : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; उपचारांना मिळतोय प्रतिसाद, राजकीय नेत्यांकडून तब्येतीची विचारपूस

•कफ आणि अशक्तपणामुळे रुग्णालयात हलवले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भेट, मुख्यमंत्र्यांसह राहुल गांधींकडून फोनवरून चौकशी

मुंबई‌ :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळी भागाचा दौरा करत असताना शरद पवार यांना कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे सुरवातीला त्यांना पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पुढील चाचण्या आणि उपचारांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

सर्वपक्षीय नेत्यांची रुग्णालयात धाव

शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजकीय वर्तुळातील अनेक बड्या नेत्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सचिन अहिर, मिलिंद देवरा, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील, अनिल देसाई, राणा जगजित सिंह पाटील आणि उद्योगपती गौतम अदानी यांनी रुग्णालयात जाऊन पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

फोनवरून तब्येतीची चौकशी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून पवारांच्या प्रकृतीची माहिती घेतली.याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकारचे मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवरून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

रुग्णालयात भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “मी पवार साहेबांची भेट घेतली असून त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि त्यात सुधारणा होत आहे. भेटीदरम्यान राज्यातील दुष्काळ आणि त्यावर उपाययोजना याबाबतही चर्चा झाली. सध्या त्यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला डॉक्टरांनी व आम्ही दिला आहे.”

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button