Sunday Mega Block : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलचा मेगा ब्लॉक; प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता

- मध्य व हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी ब्लॉक; सणासुदीच्या काळात प्रवाशांचे बेत बिघडण्याची चिन्हे
मुंबई :- दिवाळीचा सण आणि आनंदाचे वातावरण असतानाच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि प्रवासाच्या दृष्टीने अडचणीची बातमी समोर आली आहे. रविवारी (8 नोव्हेंबर 2026) मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सणाच्या दिवशी घराबाहेर पडून खरेदी किंवा फिरण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना या ब्लॉकमुळे लोकल ट्रेनच्या विलंबाचा किंवा रद्दीकरणाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक नक्की तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुख्य आणि हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉकची सविस्तर माहिती
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ धीम्या मार्गावर (Slow Line) हा मेगा ब्लॉक सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत असणार आहे. या कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि ठाण्यावरून सुटणाऱ्या धिम्या लोकल गाड्या जलद मार्गावर (Fast Line) वळवण्यात येणार असून त्या ठराविक स्थानकांवरच थांबतील.
दुसरीकडे, हार्बर मार्गावरही मोठा परिणाम दिसून येणार आहे. सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेलवरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या ‘अप’ लोकल सेवा आणि सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत सीएसएमटीवरून बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील. याशिवाय ट्रान्स-हार्बर मार्गावरही पनवेल आणि ठाणे दरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्या काही तासांसाठी बंद राहणार आहेत.
प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गाड्या रद्द राहिल्यामुळे आणि काही गाड्या उशिराने धावणार असल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सणाच्या तोंडावर प्रवाशांना होणाऱ्या या त्रासामुळे अनेकांचे नियोजित बेत बिघडण्याची चिन्हे आहेत. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक व दुरुस्तीच्या कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचेम्हटले असले, तरी सणासुदीच्या काळात अशा प्रकारे ब्लॉक घेतल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
