Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी मुंबई पोलीस आणि यंत्रणा हाय अलर्टवर!

•Police On High Alert After Threat to Blow Up Amitabh Bachchan Juhu House Amitabh Bachchan बॉम्बच्या धमक्यांच्या सत्रात आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई :- मुंबईतील जुहू येथील त्यांचा प्रसिद्ध ‘जलसा’ बंगला बॉम्बने किंवा ग्रेनेडने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या महापौर कार्यालयाला प्राप्त झालेल्या एका ईमेलमध्ये या सुरक्षेच्या धमकीचा उल्लेख करण्यात आल्यानंतर पोलीस यंत्रणा तात्काळ खडबडून जागी झाली आहे.
ईमेलद्वारे धमकी आणि मुंबईत खळबळ
मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना आणि कार्यालयांना लक्ष्य करणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या धमकीच्या ईमेलमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह लोकप्रिय पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांच्या नावांचाही समावेश आहे. या मेलमध्ये जुहू येथील ‘जलसा’ बंगल्याला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे, ज्यामुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
पोलिसांकडून कसून तपास, ‘जलसा’बाहेर कडेकोट बंदोबस्त
धमकीचा ईमेल समोर येताच मुंबई पोलिसांनी तातडीने कठोर पावले उचलत सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. एसओपी (SOP) नुसार ‘जलसा’ बंगला तसेच संशयित परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDDS) तसेच श्वान पथकाच्या (Dog Squad) मदतीने कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासात कोणतीही संशयित किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळलेली नसली, तरी सुरक्षेच्या दृष्टीने अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलीस या मेलमागचा शोध घेत आहेत.
