मुंबई

Mumbai News : मानखुर्दच्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग; एका आठवड्यातील मुंबईतील दुसरी मोठी घटना

  • मंडाळा परिसरातील आगीत सुदैवाने जीवितहानी नाही; आठवड्याभरात मुंबईतील भंगार बाजारातील दुसरी घटना

मुंबई :- मुंबईत एकामागोमाग एक आगीच्या दुर्घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घाटकोपरमधील अग्नितांडवाची घटना ताजी असतानाच, आता शनिवारी पहाटे मानखुर्द येथील मंडाळा परिसरातील युसूफ हॉटेलजवळ असलेल्या भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पहाटेच्या शांततेत अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

पहाटे 3 वाजून 32 मिनिटांच्या सुमारास मानखुर्द परिसरातील या भंगाराच्या दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाने सेकंदाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. आगीची वाढती तीव्रता आणि आजूबाजूला पसरणारा धोका लक्षात घेता, अग्निशमन दलाने अवघ्या दोन मिनिटांत म्हणजेच पहाटे 3 वाजून 34 मिनिटांनी या आगीची ‘क्रमांक -1’ची वर्दी घोषित केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह स्थानिक पोलीस, 105 क्रमांकाची रुग्णवाहिका आणि इतर संबंधित विभागाचे आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने ही आग केवळ भंगाराच्या दुकानातील साहित्यापुरतीच मर्यादित राहिल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, मात्र आगीचे नेमके कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

मुंबईत वारंवार भंगार बाजारांना लागत असलेल्या आगींमुळे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या काही दिवस आधीच, म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी साकीनाका येथील अण्णासागर स्क्रॅप मार्केटमध्येही अशाच प्रकारे भंगार साहित्याला भीषण आग लागली होती. गेल्या आठवडाभरात मुंबईतील भंगार बाजाराला लागलेली ही दुसरी मोठी आग आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे अनधिकृत किंवा नियमबाह्य साठवणूक आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव यावर आता कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button