Sanjay Raut : सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास शपथविधी सोहळ्याला हजर राहणार; संजय राऊत यांचे मिश्किल व सूचक विधान
•Sanjay Raut On Supriya Sule शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळत असेल तर स्वागतच असल्याचे मत
2 मिनिट वाचन

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार असल्याच्या राजकीय चर्चांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे आणि मिश्किल विधान केले आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधी सोहळ्याला आपण स्वतः हजर राहू, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. राऊत यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
“महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळत असेल तर स्वागतच; मात्र समर्थनाचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील” – संजय राऊत
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांबाबत विचारले असता संजय राऊत यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले की, सुप्रिया सुळे यांची कालची प्रतिक्रिया आपण पाहिली असून, “गेली 12 वर्षे माझा शपथविधी होतोय,” असे त्या म्हणाल्या आहेत. सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल. केवळ 10 आमदार असलेल्या आणि त्यातही गट असलेल्या पक्षाला भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकत असेल, तर तितकी दिलदारी भाजपकडे आहे आणि एक नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला. त्यांनी शपथ घेतल्यानंतरच आपण यावर अधिक बोलू, असेही ते म्हणाले.
प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला होता, तसाच पाठिंबा सुप्रिया सुळेंना देणार का, या प्रश्नावर राऊत यांनी सांगितले की, त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. व्यक्तिगत पातळीवर विचाराल तर सुप्रिया सुळे खरोखर मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचे स्वागत केले पाहिजे.
“त्या आमच्या घरातील सदस्य”; रोहित पवारांचेही केले कौतुक
सुप्रिया सुळे या आपल्या कुटुंबातील सदस्य असल्याचे नमूद करत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, त्या मुख्यमंत्री होत असतील तर आनंदच आहे. 12 वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार असतील तर चांगली बाब असून, शपथ घेतल्यानंतर आपण त्यांचे स्वागत करू आणि त्यांच्या शपथविधी सोहळ्याला स्वतः हजर राहू.
दुसरीकडे, राष्ट्रवादीत रोहित पवार एकाकी पडल्याच्या चर्चांवर बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षातील धोरणात्मक निर्णयांवर आपण भाष्य करू शकत नाही. मात्र, रोहित पवार अनेक प्रश्नांवर आंदोलन व संघर्ष करत असून, ते घेत असलेले प्रश्न जनहिताचे आणि महत्त्वाचे आहेत. ते पवार कुटुंबातील व राजकारणातील महत्त्वाचे नेते असून, कोणी त्यांना मुद्दाम एकाकी पाडत असेल यावर आपला विश्वास नाही, असेही राऊत यांनी नमूद केले.




