मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

जिवंतपणीच अंतिम संस्काराचे बुकिंग! दिल्लीत सुरू झाली अनोखी सेवा

29 हजारांपासून पॅकेज, नेमकं काय मिळणार?

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

3 मिनिट वाचन

फोटो

नवी दिल्लीः मृत्यू अटळ असला, तरी तो कधी आणि कसा येईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे अनेकजण आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांमध्ये संपत्तीवरून वाद होऊ नये म्हणून मृत्यूपत्र तयार करतात. मात्र, आता काही लोक आपल्या निधनानंतर होणाऱ्या अंत्यसंस्कारांचीही जिवंतपणीच व्यवस्था करू लागले आहेत. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या एका अनोख्या स्टार्टअपमुळे हा विषय चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, या सेवेसाठी नागरिकांकडून आधीच बुकिंग केली जात आहे.

मृत्यूनंतरची धावपळ टाळण्यासाठी आधीच नियोजन

एखाद्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा आघात झालेला असतो. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी, शववाहिका, पुरोहित, लाकूड, फुले आणि पूजेचे साहित्य यांची व्यवस्था करणे अनेकदा कठीण जाते. हीच अडचण लक्षात घेऊन ‘मोक्ष व्हॉयेज’ (Moksh Voyage) या स्टार्टअपने अंत्यसंस्कार नियोजनाची सेवा सुरू केली आहे.

या सेवेमध्ये व्यक्तीला स्वतःच्या हयातीतच अंत्यसंस्काराशी संबंधित व्यवस्था निश्चित करता येते. त्यामुळे निधनानंतर कुटुंबीयांना ऐन दुःखाच्या प्रसंगी वेगवेगळ्या ठिकाणी संपर्क साधण्याची आणि आवश्यक वस्तूंची जुळवाजुळव करण्याची गरज कमी होऊ शकते. कंपनीच्या माहितीनुसार, आतापर्यंत 300 हून अधिक जणांनी या सेवेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये स्वतःच्या अंतिम प्रवासाचे नियोजन आधीच करणाऱ्या नागरिकांचाही समावेश आहे.

29,999 रुपयांपासून पॅकेज; दीड लाखांपर्यंत खर्च

या स्टार्टअपने ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळी पॅकेजेस उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये पुढील पर्यायांचा समावेश आहे.

- सन्मान सेवा: 29,999 रुपये

- श्राद्ध सेवा: 69,999 रुपये

- मोक्ष संकल्प सेवा: 1,49,999 रुपये

याशिवाय स्वतंत्र सेवाही उपलब्ध आहेत. अंतिम यात्रा वाहनासाठी 5,999 रुपये, अर्थी आणि पूजासाहित्य किटसाठी 9,999 रुपये, पुरोहित सेवेसाठी 5,999 रुपये, अस्थी संकलनासाठी 2,999 रुपये आणि अस्थी विसर्जनासाठी 5,999 रुपये शुल्क असल्याचे उपलब्ध माहितीत नमूद करण्यात आले आहे. पिंडदानासाठी ठिकाण आणि विधीनुसार 15 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. चार खांद्यांपासून अस्थी विसर्जनापर्यंत सर्व व्यवस्था

या स्टार्टअपकडून केवळ अंत्यसंस्कारच नव्हे, तर त्यानंतरच्या धार्मिक विधींचीही व्यवस्था केली जाते. यामध्ये पार्थिव शरीराला खांदा देण्यासाठी चार व्यक्ती, शववाहिका, अंत्यसंस्कारासाठी लाकूड, फुले, पूजेचे साहित्य आणि पुरोहित यांचा समावेश आहे. तसेच अस्थी संकलन, अस्थी विसर्जनासाठी नाव आणि घाटाची व्यवस्था, श्राद्धविधी आणि इतर धार्मिक विधींसाठीही मदत केली जाते.

एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि परदेशात राहणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी मदत

आजच्या काळात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. काहींची मुले नोकरी किंवा व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झाली आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारांची व्यवस्था करणे मोठे आव्हान ठरू शकते. ही अडचण लक्षात घेऊन अशा नागरिकांसाठी ही सेवा उपयोगी ठरू शकते. विशेष म्हणजे, मृत्यूनंतर कुटुंबीयांवर आर्थिक आणि मानसिक ताण येऊ नये, यासाठी आधीच नियोजन करण्याचा पर्याय या माध्यमातून उपलब्ध झाला आहे.

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया

स्वतःच्या अंत्यसंस्काराचे जिवंतपणीच बुकिंग करण्याची कल्पना अनेकांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे. काही नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, कठीण प्रसंगी कुटुंबीयांची धावपळ कमी करणारी ही व्यवस्था असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, मृत्यू आणि धार्मिक विधींनाही व्यावसायिक स्वरूप दिले जात असल्याची टीका काही जण करत आहेत. त्यामुळे ही सेवा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर