मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावा

महाराष्ट्रात दोन खासदारांवर संपर्काची जबाबदारी सोपवल्याचा आरोप; ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

खासदार संजय राऊत
खासदार संजय राऊत

politics:मुंबई : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना (डीलिमिटेशन) विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, महिला आरक्षण विधेयकाच्या आडून लोकसभेतील मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सध्याच्या ५४३ जागांवरून लोकसभेची सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्याची तयारी सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपकडून हा राजकीय डाव आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारांची तयारी सुरू असल्याचा आरोप करत राऊत यांनी प्रत्येक खासदारासाठी १५० कोटी रुपयांचा भाव ठरवण्यात आल्याचे म्हटले. या व्यवहारांसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मध्यस्थ नेमण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. महाराष्ट्रात झारखंड आणि आंध्र प्रदेशातील दोन खासदारांवर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले. मात्र, या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणतेही पुरावे सार्वजनिक केलेले नाहीत.

विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे गद्दार ठरतील

या विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या खासदारांना देशाची जनता कधीही माफ करणार नाही, असे राऊत म्हणाले. देशाची लोकशाही आणि संसदेचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीही ईव्हीएम आणि मतचोरीच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. आता मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले.

उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्ट

या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपने उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संपर्क सर्वांशी होत असतो; मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट असल्याचे राऊत यांनी सांगितले. ज्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखे पक्ष फोडले, त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, केंद्र सरकारने संसदेचे विशेष कामकाज ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्याची तयारी केली आहे. लोकसभा ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभा २ डिसेंबरला पुन्हा भरवण्यात येणार आहे. हे कामकाज ३ डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी संबंधित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर