मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
politics: खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप; महिला आरक्षणाच्या नावाखाली डीलिमिटेशनचा डाव असल्याचा दावाMumbai Crime : मुंबई महापौर कार्यालयाला बॉम्बची धमकी; प्रशासनात खळबळ, परिसरात सुरक्षा वाढवलीMaharashtra News : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट ; धरणांमधील पाणीसाठ्यात २८ टक्क्यांची घटMumbai News : शेतकरी कुटुंबांना तीन महिने मोफत धान्य; ४२ लाखांहून अधिक कुटुंबांना दिलासाPaternity Leave पुरुष सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार १५ दिवसांची पितृत्व रजाPune Airport News : पुणे विमानतळ येथे वाहतूक कोंडीवर उपाय

त्र्यंबकेश्वरमध्ये पूजेनंतरची वस्त्रे पुन्हा बाजारात!

पहाटे वापरलेल्या कपड्यांचे संकलन प्रक्रिया करून नव्या वस्त्रांच्या नावाखाली विक्री केल्याचा आरोप

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर

नाशिक, प्रतिनिधी : धार्मिक विधींसाठी वापरलेली आणि पूजेनंतर त्याज्य म्हणून सोडून दिलेली वस्त्रे पुन्हा भाविकांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कालसर्प आणि नारायण नागबळी पूजा केल्यानंतर भाविकांनी सोडलेली पांढरी वस्त्रे पहाटेच्या वेळी गोळा केली जातात. त्यानंतर ही वस्त्रे वाहनांमधून नाशिकला नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते आणि पुन्हा त्र्यंबकेश्वरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कुंडलीतील दोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात. या धार्मिक विधींच्या वेळी भाविकांना सुतकाची पांढरी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले जाते. स्नानानंतर ही वस्त्रे त्याज्य मानून तेथेच सोडण्यास सांगितले जाते. मात्र, भाविक निघून गेल्यानंतर या वस्त्रांचे संकलन केले जात असल्याचा आरोप आहे.

दररोज १२ हजार वस्त्रांची मागणी

त्र्यंबकेश्वरमध्ये या धार्मिक विधींसाठी दररोज १२ हजार वस्त्रांची मागणी असल्याचे सांगण्यात येते. भाविकांना कुर्ता, पंचा आणि साडी असा साधारण ५०० ते ७०० रुपयांचा संच नवीन असल्याचे सांगून विकला जातो. मात्र, या वस्त्रांपैकी काही वस्त्रे यापूर्वी धार्मिक विधींमध्ये वापरलेली असतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून पुन्हा विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुरोहित संघाकडून कारवाईचे आश्वासन

या प्रकाराबाबत त्र्यंबक पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी आक्षेप नोंदवला आहे. कुंडली आणि पितृदोष निवारणाचे विधी शुद्धीसाठी केले जात असल्याने त्यासाठी नवीन वस्त्रे आवश्यक आहेत. वापरलेली सुतकी वस्त्रे पुन्हा विकली जात असतील, तर ते चुकीचे आहे. असा प्रकार करणाऱ्यांबाबत भाविकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि तक्रारी आल्यास त्यांची दखल घेतली जाईल, असे थेटे यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वरपुरताच हा प्रकार मर्यादित नसून पंढरपूर आणि आळंदी यांसारख्या तीर्थक्षेत्रांमध्येही भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर