अधिवेशनापूर्वी शरद पवार गटाचा खासदारांना व्हीप
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे यांची सावध भूमिका
2 मिनिट वाचन

मुंबई, महाराष्ट्र मिरर : केंद्र सरकारने ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. मात्र, या अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय आहे, याची माहिती नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकावर भाष्य करणे टाळले आहे.
पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हा व्हीप जारी केला आहे. अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीत सर्व खासदारांनी सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहावे, पक्षाच्या भूमिकेनुसार मतदान करावे आणि कामकाजात सहभागी व्हावे, असे निर्देश व्हीपमध्ये देण्यात आले आहेत. पक्ष जो निर्णय घेईल, त्याला पाठिंबा देण्याचेही खासदारांना सांगण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा अद्याप स्पष्ट नसल्याचे सांगितले. अधिवेशन बोलावले की प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी करतो, असे त्यांनी नमूद केले. डिलिमिटेशन विधेयक अद्याप पाहिलेले नसल्याने त्यावर आताच भूमिका मांडणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीतील नेत्यांसोबत विविध मुद्द्यांवर दररोज चर्चा होत असल्याचे सांगत सुळे यांनी संजय राऊत यांच्याबाबतही प्रतिक्रिया दिली. संजय राऊत हे देशाचे आणि राज्याचे मोठे नेते असून ते आपले मोठे भाऊ आहेत. त्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्या म्हणाल्या.
पक्षांतर्गत बदलांवरही स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महिला प्रदेशाध्यक्षपदावरील बदलाबाबत बोलताना सुळे यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे नव्या व्यक्तींना संधी देण्यात आल्याचे सांगितले. युवक आणि महिला आघाडीमध्ये कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पक्षाची जुनी पद्धत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र मिरर




