भारताच्या आर्थिक धोरणाचे उदाहरण देत ट्रम्प यांचा फेडरल रिझर्व्हवर निशाणा
अमेरिकेतील जादा व्याजदरांमुळे विकासाला खीळ; भारताचा ७ टक्के जीडीपी विकासदर पुढे करत व्याजदर कपातीची मागणी
2 मिनिट वाचन

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : भारतातील कमी व्याजदर आणि वेगवान आर्थिक विकासाचे उदाहरण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या केंद्रीय बँकेवर (फेडरल रिझर्व्ह) टीका केली आहे. भारतात व्याजदर कमी असूनही जीडीपी विकासदर सात टक्क्यांवर असल्याचे सांगत अमेरिकेत मात्र जादा व्याजदरांमुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला अडथळा निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. आशिया दौऱ्यावरून परतल्यानंतर व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.
अमेरिकेतील व्याजदर कमी न होण्यामागे फेडरल रिझर्व्हची कार्यपद्धती आणि राजकीय दृष्टिकोन कारणीभूत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. देशाची आर्थिक आकडेवारी सकारात्मक असतानाही व्याजदर कमी करण्याऐवजी ते उच्च पातळीवर ठेवले जात असल्याचे त्यांनी म्हटले. आर्थिक कामगिरी सुधारत असताना व्याजदर कपात अपेक्षित असते; मात्र फेडरल रिझर्व्हकडून त्याच्या उलट भूमिका घेतली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
फेडरल रिझर्व्ह ही संस्था अधिकाधिक राजकीय होत चालली असून, तिच्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे ट्रम्प म्हणाले. संस्थेच्या अध्यक्षांपुरती आपली नाराजी मर्यादित नसून, संपूर्ण संस्थेच्या धोरणांवर आक्षेप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा दाखला देताना ट्रम्प यांनी कमी व्याजदर आणि सात टक्के जीडीपी विकासदर यांचा उल्लेख केला. भारत कमी व्याजदरातही चांगली आर्थिक वाढ साधत असेल, तर अमेरिकेलाही अशा धोरणाचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. व्याजदर कमी ठेवले असते, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास अधिक वेगाने झाला असता, असे त्यांचे म्हणणे आहे.
ग्रीनस्पॅन यांच्या धोरणांचे केले कौतुक
फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांच्या कार्यकाळाचा दाखला देत ट्रम्प यांनी त्यांच्या धोरणांचे कौतुक केले. त्या काळात आर्थिक आकडेवारी समाधानकारक असताना व्याजदर कमी करण्यावर भर दिला जात होता, असे त्यांनी सांगितले. आर्थिक स्थिती सुधारत असताना व्याजदर कपात करणे योग्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
व्याजदर कमी केल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल, तसेच सरकारवरील कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल, असा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकेचा जीडीपी विकासदर सध्या चार टक्क्यांच्या आसपास असल्याचे सांगत, योग्य व्याजदर धोरण राबवले असते तर विकासदर १५ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला असता, असेही त्यांनी म्हटले.

महाराष्ट्र मिरर




