Raj Thackeray : ‘सत्तेत असताना लोकशाही वाचवण्याचे नाटक कशाला? राज ठाकरे’

•राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल, पराभव पचवण्याचा सल्ला ,जगातली पहिलीच घटना; सत्ताधारीच काढतातय मोर्चे!
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत आक्रमक पोस्ट शेअर करत भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या मुद्द्यावरून आणि राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्तेच्या उच्च सिंहासनावर बसून ‘लोकशाही वाचवा’ अशी हाक देणाऱ्या भाजपचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
भारतीय जनता पक्षाचा कारभार हा एक अजब प्रकार असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी थेट निशाणा साधला आहे. “जो पक्ष तळापासून वरपर्यंत संपूर्ण सत्तेत आहे, तोच पक्ष आज ‘लोकशाही वाचवा’ म्हणून रस्त्यावर उतरून मोर्चे काढत आहे. जगाच्या इतिहासातले हे एकमेव उदाहरण असावे, जिथे खुद्द सत्ताधारी पक्षच विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढत आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. लोकशाहीची भाषा करणाऱ्यांनी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ निवडणुकीत नेमके काय केले, याची आठवणही त्यांनी या पोस्टमधून करून दिली.
‘गोकुळ’च्या निकालावर घाला, अन् दुष्टचक्र सुरू!
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत भाजप पॅनलचे 12 तर सतेज पाटील पॅनलचे 13 संचालक लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर निवडून आले होते. यावर बोट ठेवत राज ठाकरेंनी विचारले की, “तुम्हाला जर खरोखरच लोकशाहीची चाड असेल, तर जनता पॅनल हरल्यानंतर तुम्ही लगेच सरकारचे 5 संचालक का नेमले? आणि त्यांना थेट मतदानाचा अधिकार देऊन तुम्ही नेमके काय सिद्ध करू पाहताय?” लोकशाहीच्या मार्गाने सत्ता हातात घेता आली नाही, म्हणून सर्व तत्त्व बाजूला सारून स्वतःच्या फायद्यासाठी लोकशाहीचा गळा आवळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाण्याचा नाही, तर समजूतदारपणाचा दुष्काळ!
एकीकडे महाराष्ट्रातील जनता तीव्र पाणीटंचाई आणि भीषण दुष्काळाशी दोन हात करत आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळात वेगळेच राजकारण तापले आहे. यावर उपरोधिक कोटी करत राज ठाकरे म्हणाले की, “सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ पडला आहे, आणि त्याच वेळी भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा काय पडावा, याचंच मला आश्चर्य वाटते!” सत्तेत राहून मनमानी करायची आणि स्वतःच नियम मोडायचे, हेच सध्या सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला.
आता भाजपने ‘रडीचा डाव’ बंद करावा!
राजकारणात कायमस्वरूपी यश किंवा सत्ता कोणाचीही नसते, हे सांगताना राज ठाकरेंनी भाजपला थेट शब्दांत कानउघडणी केली आहे. “भाजपने आता हा रडीचा डाव खेळणे तातडीने थांबवले पाहिजे. कुठल्याही मार्गाने तुम्ही मिळवलेले बहुमत विरोधी पक्षांनी तब्बल 12 वर्षे निमूटपणे सहन केले. आता जर या देशातील आणि राज्यातील सामान्य जनता विरोधी पक्षांकडे झुकायला लागली आहे, तर त्या जनादेशाचा आदर करायला आणि पराभव पचवायलाही भाजपने शिकले पाहिजे,” अशा सक्त शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
