Pune News : मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून नवीन ११ फिडर बसमार्ग सुरू!
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रवाशांच्या प्रवासाला अधिक वेग आणि सुलभता देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कडून मेट्रो स्टेशनसाठी विशेष फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. महामेट्रोमार्फत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर (मेट्रो लाईन क्र. ३) ही नवीन मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या नवीन मेट्रो मार्गाशी नागरिकांची कनेक्टिव्हिटी उत्तम राहावी, यासाठी नव्याने ११ फिडर बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत, तसेच एका आधीच्या बसमार्गाचा विस्तारही करण्यात आला आहे.या नव्या नियोजनामुळे प्रवाशांना मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचणे अतिशय सोपे होणार आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
पीएमपीएमएलने एकूण २५ गाड्यांच्या माध्यमातून तब्बल ६२० फेऱ्यांचे नियोजन केले आहे. यामध्ये पिंपरी मेट्रो स्टेशन ते वाकड चौक, माण एमआयडीसी सर्कल ते निल सॉफ्ट कंपनी, म्हाळुंगेगाव ते टीसीएस माण मेट्रो स्टेशन, तसेच बालेवाडी आणि हिंजवडी परिसरातील विविध आयटी पार्क व रहिवासी क्षेत्रांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
तसेच, मेट्रो लाईन क्रमांक ३ च्या सुरुवातीमुळे प्रवाशांच्या सोयीसाठी तब्बल २२ नवीन बसथांबे देखील नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये टीसीएस/माण मेट्रो स्टेशन, शिवाजीनगर मेट्रो स्टेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मेट्रो स्टेशन, बाणेर फाटा, बालेवाडी हायस्ट्रीट आणि हिंजवडी परिसरातील विविध मेट्रो स्थानकांचा समावेश आहे.
या विशेष बससेवेमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वेळेत होईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जास्तीत जास्त प्रवाशांनी या मेट्रो फिडर बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य परिवहन व्यवस्थापक (ऑपरेशन) आणि जनसंपर्क अधिकारी, पीएमपीएमएल यांच्याकडून, नागरिकांना करण्यात आले आहे.


