पुणे

Pune News : बावधनमधील ५ आरएमसी प्लांटवर प्रशासनाची मोठी कारवाई

Pune News : पाच बेकायदेशीर प्रकल्पांना दणका; उरलेल्या अनधिकृत प्रकल्पांवरही कारवाईची मागणी

Pune News :पुणे: पुणे महानगरपालिका हद्दीतील बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्द परिसरात विनापरवाना आणि नियम डावलून सुरू असलेल्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांट (आरएमसी) विरोधात प्रशासनाने अखेर दंडात्मक व कठोर पावले उचलली आहेत. स्थानिक नागरिकांचा लढा आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, परिसरातील तब्बल पाच आरएमसी प्लांटवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रदूषण आणि त्रासामुळे त्रस्त झालेल्या स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

विनापरवाना सुरू होते ‘काँक्रीटचे साम्राज्य’


बावधन बुद्रुक व बावधन खुर्द परिसरात एकूण आठ आरएमसी प्लांट विनापरवाना सुरू असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, महापालिकेच्या लेखी उत्तरातून हे स्पष्ट झाले होते की, यातील एकाही प्लांटकडे महापालिकेचा वैध मशीन परवाना नाही, अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र नाही आणि बांधकाम विकास विभागाकडे मंजुरीसाठी एकही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. असे असतानाही हे प्लांट दिवस-रात्र अहोरात्र सुरूच होते.

रात्रीच्या वेळी, विशेषतः पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे प्लँट्स सुरू केले जात असत. यामुळे उडणारी तीव्र धूळ, सिमेंटचे कण आणि सततच्या जड वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. लहान मुले, वृद्ध आणि नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.

या अनधिकृत प्रकाराविरोधात बावधनमधील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, आंदोलने छेडली. या संपूर्ण प्रकरणात महापालिकेचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी नागरिकांच्या पाठीशी उभे राहत प्रशासनावर योग्य तो दबाव आणला. ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांना नियमबाह्य बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या.

अखेर या वाढत्या दबावानंतर आणि जनक्षोभासमोर प्रशासनाला नरमाईची भूमिका सोडावी लागली, व ५ आरएमसी प्लँट्सवर थेट कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विजयामुळे “हा लढा एकसंध राहिलेल्या प्रत्येक नागरिकाचा विजय आहे,” अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

पाच प्लांटवर कारवाई झाली असली, तरी परिसरातील उरलेल्या अनधिकृत प्रकल्पांवरही कारवाई व्हावी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्रकरणात कडक पावले उचलेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. जर यापुढेही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच राहिला, तर प्रसंगी मंत्रालय किंवा राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागण्याचा स्पष्ट इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील बेकायदेशीर व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button