Mumbai News : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून राज ठाकरे आक्रमक; भाजपवर साधला निशाणा, म्हणाले, ‘समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ’
Mumbai News : मुंबई : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा आणि त्यापैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भाजपच्या पॅनेलचे १२, तर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे १३ उमेदवार निवडून आले. त्यामुळे विरोधकांना बहुमत मिळाले असतानाही शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करून सत्ताधारी पक्षांकडून सत्तेची समीकरणे बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष असल्याची टीका करत, सत्तेत असतानाही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढणारा हा जगातील एकमेव पक्ष असावा, असा टोला त्यांनी लगावला..https://maharashtramirror.com/ Mumbai News
‘बहुमत मिळवता आले नाही म्हणून सत्तेचा गैरवापर का?’
गोकुळच्या निवडणुकीत लोकशाही आणि बॅलेट मतदान पद्धतीने निवडून आलेल्या विरोधी पॅनेलला बहुमत मिळाले असताना सरकारने पाच संचालकांची नियुक्ती का केली, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देऊन नेमके काय साध्य करायचे आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला. लोकशाहीची खरोखरच काळजी असेल, तर बहुमताच्या कौलाचा आदर करायला हवा होता. मात्र, गोकुळमध्ये सत्ता मिळवता आली नाही म्हणून सत्ताधाऱ्यांनी आपली तत्त्वे बाजूला ठेवली आहेत, अशी टीका त्यांनी केली.
‘भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ’
राज्यात सध्या पाण्याचा भीषण दुष्काळ असताना भाजपमध्ये समजूतदारपणाचाही भीषण दुष्काळ पडल्याचे दिसत आहे, असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांनी लगावला. भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे, असेही त्यांनी सुनावले. गेल्या १२ वर्षांत भाजपने ज्या मार्गाने बहुमत मिळवले, ते विरोधी पक्षांनी सहन केले. आता जनतेचा कल विरोधी पक्षांकडे झुकू लागला आहे, तर भाजपनेही लोकशाही प्रक्रियेचा आदर करत हे वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गोकुळ दूध संघातील शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्षाचा मुद्दा बनला आहे. राज ठाकरे यांच्या टीकेमुळे या वादाला आणखी राजकीय धार मिळण्याची शक्यता आहे.


