Pune News : आरटीओकडून खाजगी बसेसकडून मनमानी भाडे आकारणाऱ्यांवर दंडात्मक बडगा; नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर – दिवाळी व सणासुदीच्या काळात खाजगी ट्रॅव्हल्स आणि कंत्राटी बसेसकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पुणे तर्फे एक विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या प्रतिकिमी भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. पुणे शहर आणि परिसरात आरटीओ विभागाने राबवलेल्या या विशेष मोहिमेअंतर्गत सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२६ मध्ये एकूण ९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१५ वाहने दोषी आढळली असून ७ वाहने प्रवाशांकडून जादा भाडे आकारताना निदर्शनास आली आहेत. या सर्व कारवायांमधून तब्बल २५.८२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, १ नोव्हेंबर २०२६ ते आतापर्यंत चालवलेल्या विशेष मोहिमेत ३०९ वाहनांची तपासणी झाली असून ६५ वाहने दोषी आढळली आहेत. यातील १४ वाहने विहित मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारत होती, त्यांच्यावर कारवाई करत ७.०४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
प्रवाशांना तक्रार करण्याचे आवाहन:
प्रवासादरम्यान कोणत्याही खाजगी बसने जादा भाडे आकारल्यास किंवा काही अडचणी आल्यास प्रवाशांनी पुढे येऊन तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाच्या फोटोरूपी पुराव्यासह ८२७५३३१०१० या समर्पित व्हॉट्सॲप क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. तसेच, खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व चालक, मालक व प्रतिनिधींनी आपल्या वाहनांची कागदपत्रे वैध (अप-टू-डेट) ठेवावीत, शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच भाडे आकारावे आणि परिवहन विभागाच्या पथकाला तपासणीदरम्यान पूर्ण सहकार्य करावे, अशी तंबी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली आहे.


