Pune News : महाराष्ट्रभर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! १.५३ कोटींचा अन्नसाठा जप्त; १४ आस्थापनांचे परवाने निलंबित
Pune News : पुण्यातील सहा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर कारवाई; ६७.५५ लाखांचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि वाहन जप्त, दोन गुन्हे दाखल, एकाला अटक
4 मिनिट वाचन

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : राज्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी कारवाई केली आहे. या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल १ कोटी ५३ लाख रुपयांहून अधिक किमतीचा अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, १४ अन्न व्यावसायिक आस्थापनांचे परवाने आणि व्यवसायाचे कामकाज निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय दोन गुन्हे दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यातील सहा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील युनिबॉर्न फूड इंग्रेडिएंट्स एलएलपी (Uniborn Food Ingredients LLP) या कंपनीच्या गोदामातून ६८ हजार २४.४० किलो अन्नपदार्थ आणि कच्चा माल जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत १ कोटी ५३ लाख १५ हजार ९७० रुपये आहे. २६ नोव्हेंबर रोजी केलेल्या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम २३, २६ आणि २७ चे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये मॉडिफाइड स्टार्च, डिमिनरलाइज्ड व्हे पावडर, सेल्युलोज गम, नेटिव्ह पोटॅटो स्टार्च, झॅन्थन गम, पिझ्झा फ्लोअर, फेटा चीज आणि यूएचटी मस्करपोन यांचा समावेश आहे.
पुण्यातील सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
या राज्यव्यापी कारवाईत पुणे जिल्ह्यातील सहा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर प्रशासनाने कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान अस्वच्छता, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा मानके (परवाना व नोंदणी) नियमावली २०११ मधील अनुसूची चारच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळले.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये औंध येथील वेस्टएंड मॉलमधील वडेश्वर रेस्टॉरंट्स प्रा. लि., कोंढवा खुर्द येथील एनआयबीएम रोड क्रॉसवरील ज्योती रेस्टॉरंट, लोहगाव येथील न्यू जायका रेस्टॉरंट, नवी सांगवीतील साई चौक येथील हॉटेल आमंत्रण (व्हेज-नॉनव्हेज), खेड तालुक्यातील संतोषनगर येथील हॉटेल गंधर्व प्युअर व्हेज आणि जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील हेमंत गार्डन रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.
मुंबईतील डोंगरी येथील हॉट पॉट या आस्थापनाचे कामकाजही तपासणीतील त्रुटींमुळे तत्काळ निलंबित करण्यात आले. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एमबीसी पार्क येथील राजिडी रिटेल प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाचा परवानाही अस्वच्छतेमुळे निलंबित करण्यात आला आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यातील हॉटेल गणराज, सेलिब्रेशन द केक शॉप, अनय रेस्टॉरंट, द शानुज बिर्याणी आणि पंचशील उपहारगृह या पाच आस्थापनांचे परवानेही अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहेत.
प्रोटीन सप्लिमेंट्सवरही प्रशासनाची नजर
सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रोटीन मार्टमधून ४२ हजार ३९८ रुपये किमतीचे संशयित निकृष्ट दर्जाचे प्रोटीन आणि न्यूट्रास्युटिकल्स उत्पादने जप्त करण्यात आली. या साठ्याचे एकूण वजन ६.०९२ किलो आहे.
यामध्ये २२ हजार ४०० रुपये किमतीच्या न्यूट्रास्युटिकल टेस्टो जीएच कॅप्सूलच्या १६ बाटल्या आणि १९ हजार ९९८ रुपये किमतीच्या फाल्कन फार्मा व्हे प्रोटीन पावडरच्या दोन बाटल्यांचा समावेश आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, टेस्टो जीएच कॅप्सूलसाठी उत्पादकाच्या परवान्यामध्ये आवश्यक मंजुरी नव्हती. तसेच आयात केलेल्या फाल्कन फार्मा व्हे प्रोटीन पावडरच्या पुरवठादाराकडे वैध आयातदार परवाना आढळला नाही. याशिवाय ऑरगॅनिक ब्राऊन राइस केकवर आवश्यक सेंद्रिय प्रमाणपत्राची मंजुरी आणि लोगो नसल्याचेही तपासणीत उघड झाले.
९४.७८ लाखांचा प्रतिबंधित माल आणि वाहन जप्त
गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुगंधित सुपारी यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांविरोधातही प्रशासनाने कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील अमित गार्डन सर्कल परिसरात २६ नोव्हेंबर रोजी प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक करणारे वाहन अधिकाऱ्यांनी पकडले.
या कारवाईत ६६.७८ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा आणि २८ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. या दोन्हींची एकूण किंमत ९४.७८ लाख रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरमध्येही एका आस्थापनातून ७७ हजार ९६० रुपये किमतीचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
नागपूरमधील संत्रा बर्फीचा नमुना असुरक्षित
नागपूरमधील चिखली लेआउट, कळमना रोड येथील अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट्समधून पॅकबंद संत्रा बर्फीचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. प्रयोगशाळेच्या तपासणीत हा नमुना असुरक्षित घोषित करण्यात आला. त्यानंतर संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करून अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली. "सार्वजनिक आरोग्याशी खेळणे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. शुद्ध अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे," असे त्यांनी सांगितले. अन्नामध्ये भेसळ करणारे तसेच प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
नागरिकांनी अन्नातील भेसळ किंवा निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांबाबत FoSCoS पोर्टल, Food Safety Connect ॲप, टोल फ्री क्रमांक १८०० २२२ ३६५ किंवा https://complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तक्रार करताना संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता, संशयित अन्नपदार्थाची माहिती आणि स्वतःचा संपर्क क्रमांक देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper




