Mumbai News : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा दिलासा! PCMC ची ३७ वर्षांची कायदेशीर लढाई संपुष्टात; मालमत्ता करमाफी उच्च न्यायालयाकडून कायम
Mumbai News : व्यावसायिक नफेखोरीच्या आरोपांना उच्च न्यायालयाचा नकार; रुग्णांकडून नाममात्र शुल्क आकारल्याने धर्मादाय संस्थेचे स्वरूप संपत नाही, न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
5 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबई , महाराष्ट्र मिरर : लोकमान्य मेडिकल फाउंडेशनला मोठा कायदेशीर दिलासा देताना मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने (PCMC) दाखल केलेली ३७ वर्षांपासून सुरू असलेली कायदेशीर लढाई निकाली काढली आहे. रुग्णालय चालविणाऱ्या धर्मादाय संस्थेला देण्यात आलेली मालमत्ता करातील सवलत उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. धर्मादाय संस्थेच्या नावाखाली रुग्णालय व्यावसायिक नफा कमावत असून कर चुकवत असल्याचा महापालिकेचा आरोप न्यायालयाने फेटाळून लावला. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १३२ (२) नुसार संस्थेला मालमत्ता करातून मिळणारी सूट योग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायमूर्ती मिलिंद एन. जाधव यांनी २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सेकंड अपील क्रमांक ४५२/१९८९ फेटाळताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. संबंधित संस्था केवळ धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणीकृत आहे म्हणून तिला करमाफी मिळत नाही, तर संस्थेच्या विश्वस्तपत्रानुसार प्रत्यक्षात धर्मादाय कार्य सुरू असल्याचे मौखिक आणि कागदोपत्री पुरावे उपलब्ध असल्यामुळे ती या सवलतीस पात्र ठरते, असे न्यायालयाने नमूद केले.
रुग्णालयात वैद्यकीय सेवांसाठी नाममात्र शुल्क आकारणे, औषधांचे दुकान चालविणे किंवा रुग्णांकडून काही रक्कम स्वीकारणे यामुळे एखाद्या संस्थेचे धर्मादाय स्वरूप आपोआप संपुष्टात येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या वादाची सुरुवात ४ सप्टेंबर १९८२ रोजी झाली. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने संबंधित ट्रस्टला २२ हजार ८२ रुपयांची मालमत्ता कराची मागणी नोटीस बजावली होती. यामध्ये ११ हजार ८६० रुपये घरपट्टी, २९७ रुपये फी कर, ७ हजार ९२० रुपये शिक्षण उपकर, १ हजार ९८० रुपये अधिभार आणि ५ रुपये नोटीस शुल्काचा समावेश होता.
ट्रस्टने करमाफीची मागणी करूनही महापालिकेने त्याला धर्मादाय संस्था मानण्यास नकार दिला. तसेच रुग्णालयाच्या मालमत्तेवर जप्ती आणून वसुली करण्याचा इशाराही दिला. त्यानंतर ट्रस्टने विरोध नोंदवत २१ मार्च १९८३ रोजी ७ हजार रुपये आणि २५ मार्च १९८३ रोजी आणखी १५ हजार ८२ रुपये जमा केले. यानंतर संस्थेने १९८४ मध्ये विशेष दिवाणी दावा क्रमांक ४१० दाखल करून आपण धर्मादाय संस्था असल्याची घोषणा आणि मालमत्ता करातून सूट मिळण्याची मागणी केली. मात्र, २७ मार्च १९८७ रोजी कनिष्ठ न्यायालयाने हा दावा फेटाळला. त्यानंतर पुण्याचे चौथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांनी १० फेब्रुवारी १९८९ रोजी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बदलून ट्रस्टला करमाफी मंजूर केली. या निर्णयाला महापालिकेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
महापालिकेचा व्यावसायिक नफेखोरीचा आरोप
महापालिकेच्या वतीने ॲड. संदीप शिंदे यांनी युक्तिवाद केला. केवळ धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणी झाल्याने एखाद्या संस्थेला मालमत्ता करातून आपोआप सूट मिळू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. रुग्णालयात आंतररुग्ण आणि बाह्यरुग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असून संस्था व्यावसायिक आणि नफेखोरीच्या तत्त्वावर काम करत असल्याचा आरोप महापालिकेने केला. प्रथम अपील न्यायालयाने रुग्णालयाच्या कामकाजाचे स्वरूप आणि उपलब्ध पुराव्यांचे योग्य मूल्यमापन केले नसल्याचेही महापालिकेने म्हटले. संस्थेचे कामकाज प्रत्यक्षात धर्मादाय स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाल्याशिवाय करमाफी देता येणार नाही, अशी भूमिका महापालिकेने मांडली. तसेच मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमातील कलम ४०६ आणि कलम २ (२९) यांचा आधार घेत मूळ दिवाणी दावा चालविण्यायोग्य नसल्याचा आक्षेपही घेण्यात आला.
धर्मादाय कार्याचे ठोस पुरावे न्यायालयासमोर
महापालिकेचे आरोप फेटाळताना न्यायमूर्ती जाधव यांनी ट्रस्टने सादर केलेल्या साक्षी आणि मोठ्या प्रमाणातील कागदोपत्री पुराव्यांची दखल घेतली. दुसरीकडे, रुग्णालय नफेखोरी करत असल्याचा आरोप सिद्ध करण्यासाठी महापालिकेकडून कोणतेही ठोस प्रतिपुरावे सादर करण्यात आले नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या निर्णयानुसार, संबंधित फाउंडेशन नागरिकांना वैद्यकीय मदत आणि वैद्यकीय शिक्षण देण्याचे काम करत होते. औद्योगिक कामगारांच्या सुमारे ३५ हजार कुटुंबांचा या संस्थेशी संबंध होता. एका व्यवस्थेनुसार, सरकारकडून प्रत्येक कुटुंबामागे वर्षाला केवळ ५ रुपये मिळत असतानाही संस्था कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत (ESI) कामगारांना वैद्यकीय सेवा पुरवत होती.
रुग्णालयाच्या अपघात व आपत्कालीन विभागात दर महिन्याला सुमारे ५०० ते ६०० आपत्कालीन आणि अपघातग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात होते. तसेच शासनमान्य कुटुंब कल्याण शिबिरे आणि केंद्रांमार्फत दरवर्षी सुमारे ७०० रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जात होते. संबंधित काळात रुग्णालयात एकूण ६० खाटा होत्या. त्यापैकी १५ प्रसूती खाटा विनामूल्य उपचारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. रुग्णांच्या कुटुंबाच्या उत्पन्नानुसार वैद्यकीय मदत आणि उपचार शुल्काचे वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले होते.
याशिवाय संस्थेकडून वैद्यकीय शिबिरे, शासनमान्य कुटुंब नियोजन केंद्रे, वैद्यकीय शिक्षणासाठी प्रदर्शने आणि व्याख्यानांचे आयोजन केले जात होते. रुग्णवाहिका, एक्स-रे आणि पॅथॉलॉजी सेवाही पुरविण्यात येत होत्या. रुग्णवाहिकेसाठी प्रतिकिलोमीटर केवळ एक रुपया शुल्क आकारले जात होते. सरकारी अनुदान, नागरिकांच्या देणग्या आणि रुग्णांकडून मिळणारे नाममात्र शुल्क यांच्या माध्यमातून संस्थेचा कारभार चालत होता. डॉ. वैद्य यांच्या साक्षीचा संदर्भ देत न्यायालयाने रुग्णालय तोट्यात चालत असल्याची बाबही नमूद केली.
'महापालिका साक्ष देण्यासाठी न्यायालयातही आली नाही'
या प्रकरणात महापालिकेने आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर न करणे हा न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाचा मुद्दा ठरला. रुग्णालयाकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप महापालिकेने केला होता. मात्र, ट्रस्टने सादर केलेल्या दरपत्रकातून रुग्णांकडून केवळ नाममात्र शुल्क घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेने स्वतःच्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. विशेष म्हणजे, कनिष्ठ न्यायालयात महापालिकेने आपली बाजू मांडण्यासाठी साक्षीदार म्हणून उपस्थित राहून साक्षही दिली नव्हती, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान पुराव्यांमधील त्रुटी भरून काढण्यासाठी अपीलच्या टप्प्यावर नव्याने पुरावे सादर करण्याची परवानगी देता येणार नाही, असेही न्यायमूर्ती जाधव यांनी स्पष्ट केले. रुग्णालय रुग्णांकडून काही शुल्क आकारते किंवा औषधांच्या दुकानातून उत्पन्न मिळवते, एवढ्याच कारणावरून संस्थेचे धर्मादाय स्वरूप नाकारता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
दिवाणी दावा योग्य; तिन्ही कायदेशीर प्रश्नांना सकारात्मक उत्तर
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०६ अंतर्गत महापालिकेने घेतलेला आक्षेप उच्च न्यायालयाने फेटाळला. ट्रस्टने दिवाणी न्यायालयात मालमत्ता कराच्या रकमेच्या आकारणीला किंवा भरण्याला आव्हान दिले नव्हते. तर आपण धर्मादाय संस्था असल्याची घोषणा आणि त्या अनुषंगाने मालमत्ता करातून सूट मिळावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे कलम ४०६ मधील प्रतिबंध या दाव्याला लागू होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दुसऱ्या अपीलमध्ये उपस्थित करण्यात आलेल्या तिन्ही महत्त्वपूर्ण कायदेशीर प्रश्नांची उत्तरे न्यायालयाने सकारात्मक दिली. संस्थेची करमाफी केवळ तिच्या नोंदणीवर आधारित नसून विश्वस्तपत्रानुसार प्रत्यक्षात राबविण्यात येणाऱ्या धर्मादाय उपक्रमांच्या पुराव्यांवर आधारित असल्याचे न्यायालयाने मान्य केले.तसेच दिवाणी दावा चालविण्यायोग्य असल्याचे स्पष्ट करत प्रथम अपील न्यायालयाने दिलेला निर्णय महापालिकेवर बंधनकारक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
अखेर १० फेब्रुवारी १९८९ रोजीचा निर्णय कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे दुसरे अपील फेटाळले आणि प्रलंबित दिवाणी अर्ज निकाली काढले. महापालिकेच्या वतीने ॲड. संदीप शिंदे यांच्यासह ॲड. जयवर्धन हजारे आणि ॲड. रिद्धी गुरव यांनी काम पाहिले. सुनावणीच्या वेळी प्रतिवादींच्या वतीने कोणीही उपस्थित नव्हते.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper




