Mumbai News : मविआत मोठी ठिणगी; ‘आम्ही त्या जागा लढणार, कसे जिंकताय बघतो’, संजय राऊतांचे खासदार अमोल कोल्हेंना थेट आव्हान
Mumbai News :डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेवरून शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक; शिरूर, माढा आणि सोलापूर मतदारसंघांत उमेदवार उतरवण्याचा इशारा देत अनिल देशमुख व नवाब मलिकांच्या माफीची मागणी
2 मिनिट वाचन

मुंबई :- मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पाठिंबा मिळण्याचे संकेत समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद आता उघड झाले असून, या वादाची पहिली मोठी ठिणगी पडली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार गटाच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना थेट आव्हान दिले आहे. “आम्ही आता त्या सर्व जागा लढणार आहोत, तुम्ही कसे जिंकून येता तेच बघतो,” अशा शब्दांत राऊत यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
शिरूर, माढा आणि सोलापूरचा उल्लेख करत थेट आव्हान
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. राऊत म्हणाले की, “या देशद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा देण्याचे काम केल्याचे निदर्शनास आले असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. यावर कितीही खुलासे केले तरी जनतेला ते मान्य नाही. शिरूरचा लोकसभा मतदारसंघ असेल, शिवसेनेशिवाय तुम्ही तिथे जिंकू शकत नाही हे मी अमोल कोल्हेंना सांगू इच्छितो. आमची माढा आणि सोलापूर यांसह प्रत्येक मतदारसंघात ताकद आहे. आता आम्ही सर्व जागा लढणार आहोत, मग तुम्ही कसे जिंकता ते आम्ही पाहतो आणि महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देऊ. आमचाही पक्ष फोडला, पण आम्ही शरण गेलो नाही,” असा घणाघात राऊत यांनी केला.
देशमुख व मलिकांची माफी मागण्याची मागणी; मविआच्या मतांची आठवण
भाजपला मदत करण्याच्या भूमिकेवरून राऊत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना जुन्या प्रकरणांची आठवण करून दिली. “तुम्ही भाजपला मदत करणार असाल तर आधी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची माफी मागितली पाहिजे, कारण भाजप आणि अमित शाह यांच्यामुळेच या दोन्ही नेत्यांना तुरुंगात जावे लागले होते,” असे राऊत म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचे आठ खासदार हे महाविकास आघाडीमुळे निवडून आले आहेत, भाजपमुळे नाही; त्यामुळे फुले, शाहू, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांचे नाव घेणाऱ्या पक्षाने एकतर्फी निर्णय घेत सरकारच्या बाजूने उभे राहू नये, राज्यातील जनता हे सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे. दुसरीकडे, विधेयकाचा मसुदा पाहूनच सामूहिक निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका खासदार अमोल कोल्हे यांनी मांडली असली तरी राऊत यांच्या या थेट आव्हानामुळे महाविकास आघाडीतील तणाव शिगेला पोहोचला आहे.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper




