Pune News : कात्रज चौक बनतोय अपघातांना निमंत्रण! वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; रस्ता ओलांडणेही झाले कठीण
Pune News : पुणे: कात्रज चौकातील वाढती वाहतूक कोंडी, सिग्नलचे उल्लंघन आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
1 मिनिट वाचन

Pune News : पुणे: कात्रज चौकातील वाढती वाहतूक कोंडी, सिग्नलचे उल्लंघन आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. चौकात वाहतूक पोलीस तैनात असतानाही वाहतुकीला शिस्त नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही धोकादायक झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे.https://maharashtramirror.com/Pune News
कात्रज चौकात दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यात खासगी सिक्स सीटर रिक्षा आणि इतर रिक्षांची गर्दी यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो. वाहनचालकांकडून सिग्नलचे उल्लंघन तसेच एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा सुरू असल्याने वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
वाहतूक पोलिसांसमोर नियमभंगाचे आव्हान
चौकात वाहतूक पोलीस उपस्थित असतानाही काही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर
कात्रज परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीवरील ताण आणखी वाढला आहे. रस्त्यावरील उपलब्ध जागा आणि वाहतुकीचे नियोजन यावर परिणाम होत असल्याने नागरिकांना दररोज कोंडीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, प्रवासासाठी अतिरिक्त वेळ खर्च होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सिग्नल तोडणाऱ्या आणि वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, रिक्षांच्या वाहतुकीचे नियोजन करणे आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
“कात्रज चौकातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी ठोस नियोजन, सीसीटीव्हीचा प्रभावी वापर आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे. नागरिकांना आश्वासने नकोत, तर सुरक्षित रस्ते हवेत. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.” — आशिष भोसले सदस्य, स्वराज्य पक्ष




