मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अमृता फडणवीसांकडे भाऊबीजेला मनोज जरांगे जाणार नाहीत

मनोज जरांगे म्हणाले, ‘बहिणीला फराळ पाठवणार!

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

अमृता फडणवीसांकडे भाऊबीजेला मनोज जरांगे जाणार नाहीत
मनोज जरांगे म्हणाले, ‘बहिणीला फराळ पाठवणार!

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आपला भाऊ मानत घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. त्यावर भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येईन, अशी मिश्कील प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली होती. त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी जरांगे खरोखरच अमृता फडणवीस यांच्या घरी जाणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आता स्वतः जरांगे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

भाऊबीजेनिमित्त माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्याकडे जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यांना भाऊबीजेचा फराळ पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनाही भाऊबीजेचा फराळ पाठवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, “भाऊबीजेला बोलवायची आवश्यकता नसते. आपण आपली बहीण अमृता फडणवीस यांना भाऊबीजेचा फराळ पाठवणार आहोत. आमच्या परीने जे शक्य आहे, ते या तिघींकडेही पाठवून देणार आहोत.”

अमृता फडणवीस यांच्या घरी जाण्याबाबत विचारले असता जरांगे यांनी जुन्या प्रसंगाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “ज्यावेळी त्यांनी बोलावले होते, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मी आंदोलनाच्या मैदानात होतो. मैदानात उतरल्यावर मागे फिरायचे नसते. त्याचवेळी बहिणीने जेवायला येण्याची साद घातली होती. मात्र, समोर लढताना दाजी होते. त्यामुळे मी तिथे गेलो असतो, तर दाजी साहजिकच जिंकले असते.”

नेमकं काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?

मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना आपला भाऊ मानत घरी जेवणासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच, सणासुदीचे दिवस लक्षात घेता माझा भाऊ जे काही करेल, ते शांततेतच करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. भाऊबीजेच्या दिवशी जरांगे घरी येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

मात्र, आता घरी जाण्याऐवजी अमृता फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबीयांनाही भाऊबीजेचा फराळ पाठवण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. त्यांच्या या मिश्कील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

शेअर करा