मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : सुप्रिया सुळे संतप्तएसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवालशिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीविक्रोळीत 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी कापड विक्रेत्याला अटक; पुन्हा परिसरात दिसताच नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यातसात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्त

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : सुप्रिया सुळे संतप्त

भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; न्यायालय परिसरातील सुरक्षेवर उपस्थित केले प्रश्न

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

खासदार सुप्रिया सुळे
खासदार सुप्रिया सुळे

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. सहा जणांच्या टोळक्याने मंदार किवळे याच्यावर आधी गोळीबार केला. गोळी चुकल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात किवळे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा कात्रजमधील संतोषनगर येथे २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी आहे. जमिनीच्या आर्थिक वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात कारागृहात असलेला किवळे चार दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली असून, त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र संताप व्यक्त केला. विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आता गुन्हेगारी आणि दहशतीचे शहर अशी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या परिसरातच भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने हल्ला होत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी कोणाकडे पाहायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

न्यायालय परिसरात पोलीस चौकी, सुरक्षा व्यवस्था आणि पोलिसांची सतत वर्दळ असतानाही हल्लेखोर शस्त्रे घेऊन येण्याचे धाडस कसे करतात, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला. पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबार, खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुणे पोलिसांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींना तातडीने अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर