पुणे मेट्रो लाईन ३ ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद; दररोज ५० हजार प्रवासी
गर्दीमुळे जिल्हा न्यायालय, वाकड चौक स्थानकांवर अतिरिक्त तिकीट गेट्स
2 मिनिट वाचन

पुणे, महाराष्ट्र मिरर : माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन ३वरून ११ नोव्हेंबरपासून दररोज जवळपास ५० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. जिल्हा न्यायालय आणि वाकड चौक स्थानकांवर गर्दी वाढल्याने तिथे अतिरिक्त तिकीट तपासणी गेट्स बसवण्यात आले आहेत. प्रवाशांना ये-जा करताना अडचण येऊ नये, यासाठी या स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडने (पीआयटीसीएमआरएल) ही व्यवस्था केली आहे.
जिल्हा न्यायालय, माण, आर. के. लक्ष्मण म्युझियम, श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक आणि वाकड चौक या स्थानकांवर प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.
गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो
सध्या या मार्गावर २० गाड्या धावत असून, दररोज सुमारे ३०० फेऱ्या होतात. गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी, तर इतर वेळी दर आठ मिनिटांनी मेट्रो उपलब्ध आहे. सेवा सुरू झाल्यापासून सुमारे ९९ टक्के गाड्या वेळेवर धावत असल्याचे पीआयटीसीएमआरएलने सांगितले.
आयटी कर्मचाऱ्यांची मेट्रोला पसंती
“प्रवासी सेवा सुरू झाल्यापासून नागरिकांकडून मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवाशांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे,” असे पीआयटीसीएमआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सैनी यांनी सांगितले. मेट्रोमुळे सुरक्षित, सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही मेट्रोला पसंती देत आहेत. त्यामुळे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) वापरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे, असे ते म्हणाले.
बालेवाडीत दोन नवी स्थानके
बालेवाडी हाय स्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होतील. त्यानंतर प्रवाशांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सैनी यांनी व्यक्त केली. उर्वरित स्थानकांची कामे लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाचा दर्जा आणि प्रवाशांची सुरक्षितता यांनाच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
२३.३ किलोमीटरचा उन्नत मार्ग
पुणे मेट्रो लाईन ३ हा माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर यांना जोडणारा २३.३ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग आहे. या मार्गावरील १७ स्थानके सध्या प्रवाशांसाठी सुरू आहेत. या मेट्रोमुळे हिंजवडी आयटी पार्कचा पुण्यातील निवासी, व्यावसायिक आणि शैक्षणिक भागांशी संपर्क सोपा झाला आहे. रस्ते वाहतुकीलाही पर्याय मिळाला आहे.

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper




