मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणीविक्रोळीत 13 वर्षीय मुलीच्या लैंगिक छळप्रकरणी कापड विक्रेत्याला अटक; पुन्हा परिसरात दिसताच नागरिकांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यातसात म्हणजे सात! उपेंद्र लिमयेंनी सांगितली साऊथची शिस्तमला ती सीतेच्या भूमिकेत अजिबात योग्य वाटली नाही” : तनिषा मुखर्जीप्यूर्टो रिकोची जेनिफर बॅरेटो ‘मिस युनिव्हर्स २०२६’लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी धीरज देशमुख यांची पुन्हा निवड; उपाध्यक्षपदी अविनाश जाधव

तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान २० वर्षीय तरुण ५० फूट दरीत कोसळला; सात तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर सुटका

बुधला माची परिसरात घडली दुर्घटना; सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे वाचला जीव

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

तोरणा किल्ला
तोरणा किल्ला

पुणे, महाराष्ट्र मिरर : हिवाळ्याची गुलाबी थंडी आणि आल्हाददायक वातावरण यामुळे सध्या गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, ट्रेकिंगदरम्यान पुरेशी खबरदारी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते. असाच एक थरारक प्रकार पुणे जिल्ह्यातील तोरणा किल्ल्यावर घडला. ट्रेकिंगसाठी आलेला २० वर्षीय तरुण पाय घसरून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेनंतर त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकांनी तब्बल सात तास शर्थीचे प्रयत्न केले. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

कैलास विलास गावडे (वय २०, रा. मुळशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, वेळेत राबविण्यात आलेल्या बचाव मोहिमेमुळे त्याचा जीव वाचला.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कैलास गावडे हा सोमवारी ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर आला होता. किल्ल्यावरील बुधला माची परिसरात फिरत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो थेट सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला. या घटनेची माहिती मिळताच त्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव

अपघाताची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस हवालदार आकाश पाटील यांनी तत्काळ सह्याद्री रेस्क्यू टीम आणि हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही पथकांचे सदस्य तसेच भोर येथील सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले.

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात झाली. दुर्गम आणि खोल दरीचा परिसर असल्याने तरुणापर्यंत पोहोचणे आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढणे हे मोठे आव्हान होते. मात्र, बचाव पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास या मोहिमेला यश आले. दरीतून बाहेर काढल्यानंतर जखमी तरुणाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या संयुक्त बचाव मोहिमेत दोन्ही रेस्क्यू पथकांच्या एकूण १७ सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि अथक प्रयत्नांमुळे तरुणाला वेळेत बाहेर काढणे शक्य झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर