मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पुणे महापालिकेची ‘दुहेरी’ भूमिका?बोपदेव घाटात भरधाव टेम्पोने चिरडल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तिघे गंभीरशिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : सुप्रिया सुळे संतप्तएसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवालशिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

'विद्रुपीकरण सम्राट'

वाढदिवशीच स्थायी समिती अध्यक्ष 'विद्रुपीकरणासाठी' पालिकेच्या 'भाऊ, फ्लेक्स काढा' मोहिमेत अव्वल; श्रीनाथ भिमाले 'साहेब', पृथ्वीराज सुतार 'दादा', तर सुनील पांडे ठरले 'भाऊ'; पहिल्याच दिवशी पोर्टलवर दीडशेहून अधिक तक्रारींचा पाऊस

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

6 मिनिट वाचन

'विद्रुपीकरण सम्राट'
वाढदिवशीच स्थायी समिती अध्यक्ष 'विद्रुपीकरणासाठी' पालिकेच्या 'भाऊ, फ्लेक्स काढा

महत्वाचे मुद्दे

*पालिकेच्या पोर्टलवर नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र आणि ठिकाणाची माहिती अपलोड करण्याची सुविधा

*संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यांनुसार व नावानुसार फ्लेक्सची संख्या मोजून सर्वाधिक फलक आढळणाऱ्यांची नावे २४ तासांच्या आत 'शहर विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी' म्हणून संकेतस्थळावर जाहीर केली जात आहेत

*या उपक्रमाला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, पोर्टलवर १५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या

*शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे दावे करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच पुणेकरांनी या मोहिमेच्या माध्यमातून आरसा दाखवला

*शहर विद्रुपीकरण पुरस्काराच्या यादीत श्रीनाथ भिमाले यांचे नाव त्यांच्या वाढदिवशी झळकल्याची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात सुरू

*शहरात सर्वाधिक जाहिरात फलक आढळल्याने भिमाले यांना प्रथम क्रमांकासह 'साहेब' हा किताब बहाल

पुणे, धनश्री ओतारी

शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत फ्लेक्सबाजीला लगाम घालण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त व प्रशासनाने सुरू केलेल्या 'भाऊ, फ्लेक्स काढा!' या डिजिटल मोहिमेचा पहिलाच दणका थेट सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या 'शहर विद्रुपीकरण पुरस्कार २०२६' च्या पहिल्याच यादीत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी अव्वल स्थान पटकावले असून, नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांचीही नावे या यादीत झळकली आहेत.

विशेष म्हणजे, श्रीनाथ भिमाले यांचा वाढदिवस असतानाच त्यांना हा 'विद्रुपीकरण पुरस्कार' जाहीर झाल्याने, प्रशासनाकडून मिळालेल्या या अनोख्या 'रिटर्न गिफ्ट'ची पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

पालिकेचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचे दावे करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनाच पुणेकरांनी या मोहिमेच्या माध्यमातून आरसा दाखवला आहे. वाढदिवस, नियुक्त्या, स्वागत, सत्कार आणि राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील चौक, रस्ते, पदपथ, दुभाजक आणि झाडांवर अनधिकृत बॅनर्स व फ्लेक्स लावण्याची स्पर्धाच पदाधिकाऱ्यांमध्ये लागलेली असते. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडे असलेले मर्यादित मनुष्यबळ पाहता, हजारो बेकायदा फ्लेक्सवर एकाच वेळी कारवाई करणे प्रशासनाला कठीण जात होते. यावर उपाय म्हणून प्रशासनाने २४ नोव्हेंबरपासून नागरिकांच्या थेट सहभागातून 'भाऊ, फ्लेक्स काढा!' ही मोहीम हाती घेतली असून, त्यासाठी 'bhauflexkadha.pmc.gov.in' हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे.

या पोर्टलवर नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे छायाचित्र आणि ठिकाणाची माहिती अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या चेहऱ्यांनुसार व नावानुसार फ्लेक्सची संख्या मोजून सर्वाधिक फलक आढळणाऱ्यांची नावे २४ तासांच्या आत 'शहर विद्रुपीकरण पुरस्काराचे मानकरी' म्हणून संकेतस्थळावर जाहीर केली जात आहेत. या उपक्रमाला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर १५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

वाढदिवशी पुरस्काराची घोषणा...

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा आज वाढदिवस. त्याच दिवशी महापालिकेच्या शहर विद्रुपीकरण पुरस्काराच्या यादीत त्यांचे नाव झळकल्याने या घोषणेची चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शहरातील अनधिकृत फ्लेक्सबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येणे, ही महापालिकेच्या कारवाईची वेगळीच बाजू ठरली आहे.

नेत्यांना मिळाले उपरोधिक किताब

पहिल्या दिवसाच्या तक्रारींच्या आकडेवारीनुसार महापालिकेने राजकीय आणि व्यावसायिक अशा दोन गटांत ही उपरोधिक पुरस्कार यादी जाहीर केली आहे. राजकीय गटात संपूर्ण शहरात सर्वाधिक जाहिरात फलक आढळल्याने स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना प्रथम क्रमांकासह 'साहेब' हा किताब बहाल करण्यात आला आहे. कोथरूड परिसरातील प्रत्येक चौकात फलक झळकल्याबद्दल नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांना 'दादा', तर गल्लीबोळांत सर्वाधिक फ्लेक्स लावल्याबद्दल सुनील पांडे यांना 'भाऊ' ठरवून विद्रुपीकरण पुरस्कार देण्यात आला आहे.

'ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल'ला प्रथम क्रमांकाचा विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर

राजकीय नेत्यांसोबतच बेकायदा जाहिरातबाजी करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांनाही प्रशासनाने दणका दिला आहे. ब्रँड्स गटामध्ये संपूर्ण शहरात जाहिराती लावणाऱ्या 'ब्रम्हप्रिया वर्ल्ड स्कूल'ला प्रथम क्रमांकाचा विद्रुपीकरण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याखालोखाल चौकाचौकांत फलक लावल्याबद्दल 'आर जीज बिर्याणी स्टोरी'ला द्वितीय, तर शहरातील विविध भागांतील भिंतींवर विनापरवाना जाहिरात केल्याबद्दल 'शांती शिखर' यांना तृतीय क्रमांकाने 'गौरविण्यात' आले आहे.

प्रशासनाच्या प्रत्यक्ष कारवाईकडे लक्ष

एकीकडे अतिक्रमणांविरोधात मोहीम उघडणारे आणि रस्ते मोकळे करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणारे सत्ताधारी नगरसेवकच आता स्वतःच्या अनधिकृत फ्लेक्सबाजीमुळे अडचणीत आले आहेत. महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता हे फ्लेक्स काढून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा आणि 'महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५' नुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आता केवळ नावे जाहीर करण्यापुरती ही मोहीम मर्यादित राहते की, प्रशासन राजकीय दबावाला बळी न पडता प्रत्यक्ष दंडवसुली आणि फौजदारी कारवाई करते, याकडे समस्त पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

अनधिकृत फ्लेक्स-होर्डिंग्जविरोधात आठ जणांवर गुन्हा

शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स बोर्ड, बॅनर आणि जाहिरात फलकांवर केवळ अतिक्रमण हटवण्यापुरती मर्यादित न राहता, पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) आता थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या परवानगीशिवाय जाहिराती लावल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आठ जाहिरातदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पीएमसीच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक मनोज नवनाथ बिडकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत आठ जहिरातदारांना अज्ञात आरोपी म्हणून नमूद करण्यात आले असून, २३ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरनुसार, २ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध सार्वजनिक ठिकाणी परवानगी न घेता जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर आणि साइनबोर्ड लावण्यात आल्याचे आढळून आले. यामध्ये बांधकाम प्रकल्प, विक्रीसाठी उपलब्ध भूखंड, पेइंग गेस्ट (पीजी) निवास आणि लॉजेसच्या जाहिरातींचा समावेश आहे.

'मंगलमूर्ती वास्तु प्रा. लि.', 'पीजी स्टील' आणि 'श्रीराम पीजी' यांच्यासह इतरांच्या जाहिराती विविध भागांत लावल्याचे तक्रारीत नमूद आहे. जाहिरातींवरील संपर्क क्रमांक आणि इतर तपशिलांच्या आधारे संबंधित जाहिरातदारांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जाणार आहे.

सार्वजनिक जागांची परवानगीशिवाय विद्रुपीकरण केल्याप्रकरणी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक अधिनियम, १९९५ च्या कलम ३ तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम २४४ आणि २४५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शहरात सर्वत्र राजकीय नेते व कार्यकर्त्यांचे बेकायदेशीर फ्लेक्स आणि बॅनर मोठ्या प्रमाणावर झळकत असतानाही, या आठ आरोपींमध्ये एकाही राजकीय कार्यकर्त्याचे नाव नसल्याने नागरिक आणि विविध स्तरांतून या कारवाईबाबत चर्चा सुरू झाली आहे.

चौकट

पुरस्करावर भिमाले यांची प्रतिक्रिया

"शहरातील कित्येक एकरांवरील टेकड्या फोडणाऱ्या, मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणाऱ्यांविरोधात भूमिका घेत आपण पुणेकरांना शुद्ध हवा मिळावी यासाठी प्राधान्याने काम करत आहोत. मात्र, अशा कृत्यांना संरक्षण देणाऱ्यांनी आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सचा गैरफायदा घेत आपल्याला ‘विद्रूपीकरण पुरस्कार’ जाहीर केला आहे. हा तर वाढदिवसानिमित्त केला जाणारा राजकीय संधिसाधूपणा आहे," असा आरोप पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी केला आहे.

शहरातील अनधिकृत केबलचे जाळे हटविण्याची मोहीम आपण सुरू केली, तेव्हा आज आपली बदनामी करणारे कुठे होते? बेकायदा होर्डिंग्जविरोधात मोहीम सुरू केली, तेव्हा ही मंडळी कुठे होती, कोण होते ? असे सवाल उपस्थित करत भिमाले यांनी टीकाकारांवर पलटवार केला आहे.त्याचबरोबर आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा जरूर द्याव्यात. मात्र, कृपया फ्लेक्स लावू नयेत. ज्यांनी प्रेमापोटी शुभेच्छांचे फलक लावले असतील, त्यांनी ते काढून घ्यावेत आणि विरोधकांना टीका करण्याची संधी देऊ नये, अशी विनंती भिमाले यांनी केली आहे.

पुणे शहरातील नागरिकांच्या डोक्यावर असलेले अनधिकृत केबलचे जाळे हटविण्यासाठी आपण पुढाकार घेतला. शहराचे हे विद्रूपीकरण दूर करण्यासाठी किती जणांनी साथ दिली आणि किती जणांनी विरोध केला, याचाही विचार व्हायला हवा, असे भिमाले यांनी म्हटले आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper