मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पुणे महापालिकेची ‘दुहेरी’ भूमिका?बोपदेव घाटात भरधाव टेम्पोने चिरडल्याने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तिघे गंभीरशिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा : सुप्रिया सुळे संतप्तएसटीच्या NCMC स्मार्ट कार्ड निविदेची चौकशी होणार; प्रताप सरनाईकांनी मागवला सविस्तर अहवालशिवाजीनगर न्यायालयाबाहेरील गोळीबाराची सरकारकडून गंभीर दखल; दोषींना पाठीशी घालणार नाही – सुनेत्रा पवारसामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी 5 कोटींची लाच मागितल्याचा संजय राऊत व नरसिंग उरगीर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

पुणे महापालिकेची ‘दुहेरी’ भूमिका?

सत्ताधारी पक्षाच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयाला ‘अभय’

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

पुणे महापालिकेची ‘दुहेरी’ भूमिका?
सत्ताधारी पक्षाच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयाला ‘अभय’

पुणे, महाराष्ट्र मिरर : शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांविरोधात पुणे महानगरपालिकेने सध्या धडक कारवाईची मोहीम उघडली आहे. मात्र, सामान्य नागरिकांवर हातोडा चालवणाऱ्या महापालिका प्रशासनाने एका भाजप नगरसेविकेच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयाला चक्क ‘अभय’ दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीच्या सामायिक ॲमेनिटी स्पेसमध्ये (सुविधा भूखंड) उभारलेल्या या बेकायदेशीर बांधकामावर स्वतः कारवाई करण्याऐवजी, ‘हे बांधकाम सोसायटीनेच हटवून सात दिवसांत अहवाल सादर करावा,’ असे अजब पत्र महापालिकेने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठवले आहे. प्रशासनाच्या या जबाबदारी झटकण्याच्या भूमिकेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे

नेमके प्रकरण काय?

शहरातील विणकर सभागृहासमोरील विणकर सोसायटीसह परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सामायिक खुली जागा आणि ॲमेनिटी स्पेस राखीव ठेवण्यात आली आहे. या राखीव आणि सामायिक जागेवर सुमारे सहा महिन्यांपूर्वी घाईघाईने बांधकाम करून भाजपच्या एका नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय थाटण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि एका संघटनेने केला आहे. नियमांनुसार सामायिक जागेवर किंवा ॲमेनिटी स्पेसमध्ये कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक अथवा राजकीय कार्यालय उभारण्यास परवानगी नाही.

अनधिकृत बांधकामाविरोधात सोसायटीच्या जागृत सभासदांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे एकदा नव्हे, तर तब्बल पाच वेळा लेखी तक्रारी आणि पत्रव्यवहार केला. या अर्जांची दखल घेऊन महापालिकेच्या पथकाने घटनास्थळी येऊन अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे अपेक्षित होते. परंतु, राजकीय दबावापोटी बांधकाम विभागाने या तक्रारींना केराची टोपली दाखवली.

सोसायटीलाच बांधकाम हटविण्याचे आदेश

उलट, आता महापालिकेने सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिवांनाच नोटीस वजा पत्र पाठवून, संबंधित अनधिकृत बांधकाम सोसायटीनेच काढावे आणि त्याचा कृती अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या या भूमिकेमुळे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असाच काहीसा प्रकार घडल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

या संपूर्ण प्रकरणात जागेच्या मालकी हक्काचा आणि नियमबाह्य भाडेपट्ट्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. परिसरातील सर्व सोसायट्यांच्या सामायिक मालकीची असलेली ही जागा एका सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी इतर सोसायट्यांना विश्वासात न घेता बेकायदेशीररीत्या भाडेपट्ट्याने दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा भाडेपट्टा करार झाल्यानंतर तातडीने तेथे कार्यालयाचे बांधकाम उभारण्यात आले. या बेकायदा भाडेपट्टा कराराविरोधात तक्रारदारांनी आता न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असून, याप्रकरणी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे.

https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा
Vikrant Kulkarni

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper