राहुल गांधींचा फोन टॅप केल्याचा आरोप; नाना पटोलेंचा मोदी सरकारला इशारा
‘माझाही फोन टॅप केला होता’; रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप, सुधारणा न झाल्यास तीव्र जनआंदोलन उभारणार
2 मिनिट वाचन

मुंबई, महाराष्ट्र मिरर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोन केंद्र सरकारकडून टॅप केला जात असल्याच्या आरोपाने देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या या आरोपांनंतर महाराष्ट्र काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते तथा आमदार नाना पटोले यांनीही आपला फोन टॅप करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर पाळत ठेवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे राजकारण भाजप करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
राहुल गांधी यांनी माझ्या फोनमध्ये माझ्या सर्व आरोपांचे पुरावे आहेत, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेले फोन टॅपिंगचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या काळात माझाही फोन टॅप करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला होता, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे, असा दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरूनही भाजपवर आरोप केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना केंद्रात पाठवण्यात आले होते. त्यानंतर भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात आले आणि पोलीस महासंचालकपदावर दोन वर्षांची मुदतवाढ देऊन बक्षीस देण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. अशा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विरोधकांचे फोन टॅप करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे, असे खालच्या दर्जाचे राजकारण भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
जनआंदोलन उभारण्याचा इशारा
विरोधी पक्षनेत्याचा फोन टॅप करण्याच्या कथित प्रकारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढे येऊन उत्तर द्यावे आणि देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. या प्रकरणात सुधारणा झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पृथ्वीराज चव्हाण यांचाही भाजपवर निशाणा
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी इस्रायली पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून प्रमुख विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून समोर आल्या होत्या, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोन टॅप करणे शक्य असले, तरी मोठ्या राजकीय विरोधकांचे फोन टॅप करण्यासाठी सर्वोच्च पातळीवरून परवानगी आवश्यक असते. गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय असे प्रकार शक्य नाहीत, असा दावा चव्हाण यांनी केला. त्यामुळे फोन टॅपिंगच्या आरोपांवरून केंद्र सरकारची भूमिका काय असणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




