स्पाइसजेट आर्थिक संकटात! विमाने जमिनीवर, उड्डाणे रद्द; कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले
१२ पैकी केवळ ९ विमाने कार्यरत; बाजारपेठेतील वाटा ०.६ टक्क्यांवर
2 मिनिट वाचन

मुंबई, महाराष्ट्र मिरर : एकेकाळी देशातील आघाडीची बजेट एअरलाइन म्हणून ओळख असलेल्या स्पाइसजेटची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. विमानांची कमतरता, वाढती थकबाकी आणि कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन यामुळे कंपनीसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. अनेक विमाने जमिनीवर उभी असून, नियमित उड्डाणांचे वेळापत्रकही विस्कळीत झाले आहे. काही कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांपासून वेतन रखडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
मे २००५ मध्ये विमानसेवा सुरू करणाऱ्या स्पाइसजेटने एकेकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बजेट एअरलाइन म्हणून स्थान मिळवले होते. मात्र, कोरोना महामारीनंतर कंपनीच्या आर्थिक अडचणी वाढत गेल्या. विमान भाडेतत्त्वावर देणाऱ्या कंपन्यांची थकबाकी, विमानतळ ऑपरेटर्सची देणी आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे कंपनीवरील दबाव वाढला आहे. वेळेवर भाडे न मिळाल्याने काही विमान भाडे कंपन्यांनी कायदेशीर मार्गाचाही अवलंब केला आहे.
उपलब्ध वृत्तांनुसार, कंपनीकडे सध्या सुमारे १२ विमाने असून, त्यापैकी केवळ नऊ विमाने कार्यरत आहेत. विमानांची संख्या कमी झाल्याचा परिणाम कंपनीच्या प्रवासी वाहतुकीवरही झाला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठेतील स्पाइसजेटचा वाटा घसरून अवघ्या ०.६ टक्क्यांवर आला.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सप्टेंबरमधील आकडेवारीनुसार, कंपनीची २०.२९ टक्के नियोजित उड्डाणे रद्द झाली. तर वेळेवर उड्डाण करण्याची कामगिरी (ओटीपी) केवळ १६.६ टक्क्यांवर राहिली. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कंपनी आता नव्या भांडवल उभारणीच्या प्रयत्नात आहे. यासंदर्भात १८ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत कंपनीच्या आर्थिक परिस्थितीबाबत आणि पुढील वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्पाइसजेट पुन्हा भरारी घेणार की आर्थिक संकटात आणखी अडकणार, याकडे विमान वाहतूक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




