‘भाऊ गेल्याच्या दिवशीच विलीनीकरणाचा विषय संपला’; सुप्रिया सुळे यांचे स्पष्ट विधान
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही; माझ्याशीही कोणतीही चर्चा झालेली नाही, दिल्लीत माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट
2 मिनिट वाचन

पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी आणि वाढत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘माझा भाऊ गेला, त्याच दिवशी माझ्यासाठी विलीनीकरणाचा विषय संपला,’ असे भावनिक विधान करत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आपल्यासमोर नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या विषयावर आपल्याशी कोणाचीही चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होती. स्वतः अजित पवार यांनी यासंदर्भात आमच्याशी संवाद साधला होता, असेही त्यांनी नमूद केले.
१७ जानेवारी रोजी गोविंदबाग येथे झालेल्या बैठकीतील चर्चेचा व्हिडिओही सर्वांसमोर आहे. त्यामुळे दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या घडामोडी लपून राहिलेल्या नव्हत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांतच आपण या विषयावर पडदा टाकल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. भावाच्या निधनानंतर वैयक्तिक पातळीवर हा विषय आपल्यासाठी संपला असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटातील नेते, आमदार आणि मंत्री शरद पवार यांची भेट घेत असल्याबाबतही त्यांनी भाष्य केले. शरद पवार यांना देशभरातील विविध पक्षांचे नेते भेटत असतात. अजित पवार यांचा गट वेगळा झाल्यानंतरही त्या गटातील अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे अशा भेटींमध्ये काही नवीन किंवा वेगळे नाही, असे त्या म्हणाल्या.
अमित शहा यांची संबंधित नेत्यांनी घेतलेली भेट हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कोण कोणाला आणि कोणत्या कारणासाठी भेटते, हा त्यांचा वैयक्तिक विषय असल्याने त्यावर आपण भाष्य करणार नसल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे.




