मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
युवा ऑलिम्पिकमध्ये गुंजन यादवची ऐतिहासिक सुवर्ण भरारी; भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर!आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे सज्ज; पॅकेज वनमधील रस्ते कामांची आयुक्तांकडून पाहणी‘रिजन्सी अविष्कार’ आणि ‘रोहन लेहर’ला पालिकेचा दणकाटीम इंडियासाठी काळा दिवस! न्यूझीलंडने 244 धावांनी लोळवले; रोहित-विराटसह दिग्गज फलंदाजांची दाणादाणराज ठाकरेंचा भाजपला सत्तेतून पायउतार होण्याचा इशारा!

युवा ऑलिम्पिकमध्ये गुंजन यादवची ऐतिहासिक सुवर्ण भरारी; भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर!

अल्जेरियाच्या प्रतिस्पर्धीला ५-० ने चितपट; डेकारमध्ये भारतीय बॉक्सिंगचा ऐतिहासिक पराक्रम

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

युवा ऑलिम्पिकमध्ये गुंजन यादवची ऐतिहासिक सुवर्ण भरारी
युवा ऑलिम्पिकमध्ये गुंजन यादवची ऐतिहासिक सुवर्ण भरारी; भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर

नवी दिल्ली : सेनेगलमधील डेकार येथे सुरू असलेल्या २०२६ युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॉक्सर गुंजन यादव हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकत युवा ऑलिम्पिकच्या इतिहासात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. गुंजनच्या या विजयामुळे भारतीय बॉक्सिंगच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गुरुवारी (१२ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात गुंजनने अल्जेरियाच्या बुथैना बेन्सालाह हिचा ५-० अशा एकतर्फी गुणफरकाने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुंजनने आक्रमक आणि नियंत्रित खेळाचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्धी खेळाडूला कोणतीही संधी न देता तिने तिन्ही फेऱ्यांमध्ये आपले वर्चस्व कायम राखले. पाचही पंचांनी गुंजनच्या बाजूने ३०-२७ असा कौल दिला.

गुंजनचा हा विजय अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरला आहे. उपांत्य फेरीत तिने इंग्लंडच्या लिली बॅसेट हिचा ४-१ असा पराभव केला होता. विशेष म्हणजे यापूर्वी बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बॅसेटने गुंजनला पराभूत केले होते. मात्र, युवा ऑलिम्पिकमध्ये गुंजनने त्या पराभवाची परतफेड करत अंतिम फेरीत धडक मारली आणि सुवर्णपदकावर नाव कोरले.

नीरज चोप्राकडून घेतली प्रेरणा

गुंजनच्या यशामागे मोठा संघर्ष आणि मेहनत आहे. २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकल्यानंतर गुंजनला क्रीडा क्षेत्रात उतरण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर तिने बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिच्या प्रशिक्षणासाठी आईनेही हिसार येथे स्थलांतर केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुंजनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली.

दरम्यान, याच स्पर्धेत भारताच्या लैरेंलाकपम अंबेकर मीतेई याने पुरुषांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. त्याने आयर्लंडच्या क्रिस्टियन जुबानीचा ३-२ असा पराभव केला. त्यामुळे डेकार युवा ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सिंग संघाने दोन सुवर्णपदके जिंकत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

शेअर करा