पंढरपुरात विहीर खोदताना भीषण दुर्घटना; तिघांचा मृत्यू, चौथ्या मजुराचा शोध सुरू
आंबे गावातील घटनेने खळबळ; २२ तासांच्या बचावकार्यानंतर तिसऱ्या कामगाराचा मृतदेह बाहेर, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत
2 मिनिट वाचन

पंढरपूर : तालुक्यातील आंबे गावात विहीर खोदकाम सुरू असताना माती आणि दगडांचा मोठा ढिगारा अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, चौथ्या कामगाराचा शोध अद्याप सुरू आहे.
रांझणी येथील सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे या दोन कामगारांचे मृतदेह बचाव पथकाला मिळाले. त्यानंतर तब्बल २२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिसरे कामगार तानाजी घोडके यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले. तर आबा घोडके या चौथ्या कामगाराचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
नेमकी दुर्घटना कशी घडली?
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे निवास शिंदे यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू होते. या कामासाठी मजूर विहिरीत उतरले असताना अचानक माती आणि दगडांचा मोठा ढिगारा त्यांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे चारही कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. घटनेनंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. सुरुवातीला एका कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शोधकार्य सुरू ठेवत आणखी दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शासन मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी असून, मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.
विहीर खोदकाम आणि ब्लास्टिंगच्या परवानगीची चौकशी होणार
या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विहीर खोदकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का, ब्लास्टिंग करण्यास परवानगी होती का आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता काम सुरू असल्यास ती गंभीर बाब असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून, चौकशीनंतर दोषींची जबाबदारी निश्चित केली जाईल. दरम्यान, चौथ्या कामगाराचा शोध सुरू असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

महाराष्ट्र मिरर




