मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला धक्का; धीरज देशमुखांच्या सहकार पॅनलची बाजीसूर्यकुमार यादवची तुफानी खेळी! १५ चेंडूंत अर्धशतक, २१ चेंडूंत नाबाद ६० धावा; मुंबईचा दणदणीत विजयबसमधील गर्दीचा फायदा घेत ७३ वर्षीय महिलेची सोन्याची बांगडी चोरीलानॉर्थ मेन रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २१.४ कोटींचे भूसंपादनएमपीएससीच्या नऊ परीक्षांतील गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी मुदतवाढ; २३ नोव्हेंबरपर्यंत निवेदने सादर करा'जिजाई'वर पार्थ पवारांची आमदारांसोबत खलबते

येवल्यात बंद घर फोडून १२ लाख ९९ हजारांचा ऐवज लंपास; २३ तोळे सोने, चार लाखांची रोकड चोरीला

देवदर्शनासाठी गेलेल्या केवारे कुटुंबाच्या घराला चोरट्यांनी केले लक्ष्य; दुचाकीसह सीसीटीव्हीचा डीव्हीआरही पळविला

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

चोर

नाशिक : येवला शहरातील कासार गल्ली परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १२ लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुटुंबीय देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटे उचकटून सुमारे २३ तोळे सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची रोकड आणि दुचाकी असा मौल्यवान मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे, चोरट्यांनी घरातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआरही सोबत नेला. या घटनेमुळे येवला शहरात खळबळ उडाली आहे.

देवदर्शनाला जाणे पडले महागात

मिळालेल्या माहितीनुसार, कासार गल्ली येथे राहणारे पुष्कराज पांडुरंग केवारे (वय ५८) हे कुटुंबीयांसह जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडी-कोंडणे तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटे उघडून मौल्यवान वस्तूंची शोधाशोध केली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास करण्यासह घरातील दुचाकी (एमएच १५ एलडी ५०३०) देखील चोरून नेली. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरट्यांनी नेल्याचे समोर आले आहे.

२३ तोळे सोने आणि चार लाखांची रोकड गायब

१४ नोव्हेंबर रोजी रात्री केवारे कुटुंबीय देवदर्शनावरून घरी परतले. त्यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाटातील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, सहा ग्रॅमचे सोन्याचे कानातील टॉप्स, दोन तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, पाच तोळे वजनाचे ११ जोड सोन्याचे टॉप्स, दहा तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय चार लाख रुपयांची रोकड, दुचाकी आणि सीसीटीव्हीचा डीव्हीआर असा एकूण १२ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

हस्तरेषा तज्ज्ञांकडून तपासणी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा

घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी हस्तरेषा तज्ज्ञांच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पुष्कराज केवारे यांच्या तक्रारीवरून येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५ अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेऊन चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

शेअर करा
स्मिता कुलकर्णी

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर