मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
पश्चिम महाराष्ट्र-कोकण तीन भुयारी मार्गांनी जोडणारकाळेवाडीत कोयत्याने वार करून तरुणावर हल्लाराहुल गांधींचा फोन टॅप केल्याचा आरोप; नाना पटोलेंचा मोदी सरकारला इशारायुवा ऑलिम्पिकमध्ये गुंजन यादवची ऐतिहासिक सुवर्ण भरारी; भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर!आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी पुणे सज्ज; पॅकेज वनमधील रस्ते कामांची आयुक्तांकडून पाहणी‘रिजन्सी अविष्कार’ आणि ‘रोहन लेहर’ला पालिकेचा दणका

जळगाव, बुलढाण्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सकाळी ९.१५ वाजता जमीन हादरली; मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र, ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद

सक
स्मिता कुलकर्णी

2 मिनिट वाचन

जळगाव, बुलढाण्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंप

जळगाव, महाराष्ट्र मिरर : राज्यातील जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी सुमारे ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास अचानक जमीन हादरल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडले. घरातील साहित्य हलल्याने नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात होता.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर परिसरासह बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे, हतनूर धरण परिसरातही जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली आहे. धरण परिसरातील चौकी दोन ते तीन सेकंद हादरल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

खरगोन जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी सकाळी ९.१५ वाजता भूकंप झाला. जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. सुदैवाने, जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हतनूर धरण परिसरातील यंत्रणा बंद

हतनूर धरण परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. मात्र, या परिसरातील भूकंप निरीक्षण यंत्रणा बंद असल्याने तेथे जाणवलेल्या धक्क्यांची नेमकी तीव्रता स्वतंत्रपणे समजू शकलेली नाही. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालघर, हिंगोली आणि नांदेडमध्येही यापूर्वी धक्के

महाराष्ट्रातील विविध भागांत यापूर्वीही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यांत वारंवार सौम्य भूकंपाची नोंद होत आहे. तलासरी, धुंदलवाडी, मोडगाव आणि कासा परिसरात यापूर्वी ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा धक्का जाणवला होता. तसेच हिंगोली आणि नांदेडच्या सीमावर्ती भागांतही ३ ते ४ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के नोंदवण्यात आले होते. त्यामुळे राज्यातील विविध भूकंपप्रवण भागांतील भूगर्भीय हालचालींकडे यंत्रणांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा
सक

बातमीदार-उपसंपादक

महाराष्ट्र मिरर