जगातील २५ टक्के किशोरवयीन मुले आवश्यक व्यायामापासून दूर
मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये व्यायामाचे प्रमाण अधिक; नियमित शारीरिक हालचालींच्या अभावामुळे भविष्यात गंभीर आजारांचा धोका
2 मिनिट वाचन

नवी दिल्ली : निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी नियमित व्यायामाला महत्त्व असले, तरी जगभरातील किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक कसरतींबाबत उदासीनता असल्याचे समोर आले आहे. जगातील सुमारे २५ टक्के किशोरवयीन मुले दररोज आवश्यक असलेला शारीरिक व्यायाम करत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये नियमित व्यायाम करण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे. त्यामुळे लहान वयातच शारीरिक हालचालींची सवय लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
किशोरवय हा शारीरिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या वयात नियमित व्यायामाची सवय न लागल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात आरोग्यावर होऊ शकतात. किशोरवयात शारीरिक हालचालींचा अभाव राहिल्यास भविष्यात हृदयविकार, टाइप २ मधुमेह तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे 'लॅन्सेट ग्लोबल हेल्थ' या नियतकालिकातील संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
या संशोधनानुसार, जगभरात केवळ ११ टक्के किशोरवयीन मुली नियमित व्यायाम करतात. मुलांमध्ये हे प्रमाण १७ टक्के आहे. म्हणजेच, नियमित व्यायामाच्या बाबतीत मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागतिक स्तरावर विविध जनजागृतीचे प्रयत्न केले जात असले, तरी त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसून येत नसल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जगभरातील ११ ते १७ वयोगटातील तब्बल २४ कोटी किशोरवयीन मुले आठवड्यातील एकही दिवस सलग तासभर शारीरिक कसरत करत नसल्याचे संशोधनात आढळले आहे. दररोज आवश्यक व्यायाम करणाऱ्यांचे प्रमाण केवळ १४ टक्के आहे. उर्वरित मुलांमध्ये व्यायामाचे प्रमाण अत्यल्प असून, ते आठवड्याला सरासरी २.७ दिवस शारीरिक कसरती करतात.
बदलती जीवनशैली, वाढता स्क्रीन टाइम, मैदानी खेळांचे कमी होत चाललेले प्रमाण आणि बैठे राहण्याच्या सवयी यामुळे किशोरवयीन मुलांच्या शारीरिक हालचालींवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शाळा, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरांवर व्यायाम व मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित होत आहे. नियमित शारीरिक हालचालींची सवय बालपणापासूनच लावल्यास भविष्यातील अनेक आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, या संशोधनात भारतातील परिस्थितीची स्वतंत्र नोंद करण्यात आलेली नाही.




