दंत उपचारांसाठी आता डेंटिस्टची चिठ्ठी अनिवार्य; शासनाचा नवा निर्णय
कृत्रिम दात, क्राऊन, ब्रिज आणि इम्प्लांट बनवताना लेखी आदेश आवश्यक; बोगस दंत तंत्रज्ञ आणि अनधिकृत प्रयोगशाळांना बसणार आळा
2 मिनिट वाचन

पुणे, महाराष्ट्र मिरर : कृत्रिम दात, कवळी, क्राऊन, ब्रिज किंवा डेंटल इम्प्लांटसाठी लागणाऱ्या कृत्रिम रचना तयार करून घ्यायच्या असतील, तर आता दंतवैद्यांची (डेंटिस्ट) लेखी चिठ्ठी किंवा इलेक्ट्रॉनिक आदेश असणे बंधनकारक करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या अधिकृत आदेशाशिवाय दंत प्रयोगशाळांना अशा रचना तयार करता येणार नाहीत. बोगस दंत तंत्रज्ञ आणि अनधिकृत दंत प्रयोगशाळांच्या कामकाजाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
दातांच्या उपचारांमध्ये रुग्णाची तपासणी करून त्याच्या गरजेनुसार कृत्रिम दात, कवळी, क्राऊन किंवा ब्रिज बसवण्याचा निर्णय दंतवैद्य घेतात. मात्र, काही ठिकाणी डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय थेट रुग्णांकडून काम स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, निर्जंतुकीकरणाच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि कामाच्या नोंदी न ठेवणे असे प्रकारही समोर आले होते. यामुळे रुग्णांना संसर्ग, तोंडातील ऊतींना इजा आणि अॅलर्जीचा धोका निर्माण होत होता.
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दंतवैद्यांनी दिलेल्या आदेशावर डॉक्टरांचे नाव, नोंदणी क्रमांक, रुग्णाचा संदर्भ क्रमांक, तयार करावयाच्या उपकरणाचा प्रकार, वापरायचे साहित्य, त्याची छटा आणि आवश्यक तांत्रिक तपशील नमूद करणे आवश्यक आहे. दंत तंत्रज्ञांना रुग्णांचे निदान करणे, उपचार ठरवणे किंवा थेट रुग्णांकडून काम स्वीकारणे यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
दंत प्रयोगशाळांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, निर्जंतुकीकरण, साहित्याची गुणवत्ता आणि यंत्रसामग्रीची सुरक्षितता राखावी लागणार आहे. कच्च्या मालाची खरेदी, गुणवत्ता तपासणी, उपकरणांचा पुरवठा तसेच ग्राहकांच्या तक्रारींवरील कार्यवाहीच्या नोंदी ठेवणे बंधनकारक असेल. मान्यताप्राप्त शैक्षणिक पात्रता आणि राज्य दंत परिषदेकडील वैध नोंदणी असलेल्या तंत्रज्ञांनाच हे काम करता येणार आहे.
दरम्यान, दंत प्रयोगशाळा, विक्रेते आणि दंत वैद्यकीय आस्थापनांची तपासणी औषध निरीक्षकांना करता येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्यामुळे दंत उपचारांसाठी रुग्णांनी नोंदणीकृत दंतवैद्यांकडूनच तपासणी करून घेणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे आवश्यक ठरणार आहे.
“दंत उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रचनांचा दर्जा आणि निर्जंतुकीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. डॉक्टरांच्या तपासणीशिवाय किंवा त्यांच्या लेखी आदेशाशिवाय कृत्रिम दात, क्राऊन, ब्रिज तयार केल्यास रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. शासनाच्या नव्या निर्णयामुळे अनधिकृत प्रयोगशाळा आणि अपात्र व्यक्तींच्या कामकाजावर नियंत्रण येईल. तसेच रुग्णांना सुरक्षित आणि दर्जेदार दंत उपचार मिळण्यास मदत होईल.”
डाॅ. शिल्पा जाधवर, दंतचिकित्सक

महाराष्ट्र मिरर




