ठाणे

Thane News : ठाण्यातील रहेजा गार्डन संकुलातील बहुमजली इमारतीला भीषण आग; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेत केली पाहणी

• ठाण्यातील वागळे इस्टेट येथील ‘कार्लाय’ इमारतीत लागली भीषण आग; 50 हून अधिक रहिवाशांची सुखरूप सुटका

ठाणे :– राज्यभरात रविवारी लक्ष्मीपूजनाचा सोहळा आनंदात साजरा होत असतानाच ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील एका बहुमजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली. रहेजा गार्डन संकुलातील ‘कार्लाय’ नावाच्या 17 मजली इमारतीच्या नवव्या मजल्यावरून सुरू झालेली ही आग काही क्षणांतच १७व्या मजल्यापर्यंत पसरली. आगीची तीव्रता प्रचंड असल्याने इमारतीमधील शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता. या गंभीर घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही वेळ न घालवता थेट मध्यरात्री घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण बचावकार्याचा आढावा घेतला.

‘तो पोरगा यंग आहे ना?’ आगीच्या आपत्कालीन परिस्थितीत अशी केली विचारपूस

घटनास्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित केला होता. अशा अंधाऱ्या आणि धोकादायक परिस्थितीतही न घाबरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातात एक मोठी बॅटरी घेतली आणि थेट इमारतीच्या आत प्रवेश केला. इमारतीच्या पार्किंग परिसरात त्यांना अग्निशमन दलाचे जवान दिसून आले, तेव्हा त्यांनी तत्परतेने जवानांकडे आग लागण्याचे कारण आणि सुरू असलेल्या बचावकार्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. इमारतीच्या वरच्या मजल्यावर कोणी अडकले आहे का, अशी विचारणा करत असतानाच जवानांनी एका तरुणाला व्हीलचेअरवरून सुरक्षित खाली आणले जात असल्याचे सांगितले. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तातडीने, ‘तो पोरगा यंग आहे ना?’, अशी विचारणा करत संबंधित तरुणाच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच इमारतीत अजूनही धूर आहे का आणि आपली टीम वर पोहोचली आहे का, याबाबतचे महत्त्वाचे प्रश्न विचारत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

अतिआधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करत 50 हून अधिक रहिवासी व पाळीव प्राण्यांना वाचवले सुरक्षित

या भीषण आगीची माहिती मिळताच ठाणे आणि मुंबई परिसरातुन अग्निशमन दलाच्या तब्बल 10 ते 15 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दल आणि TDRF च्या जवानांना या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले. या थरारक रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान इमारतीत अडकलेल्या 50हून अधिक रहिवाशांसह काही पाळीव प्राण्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. या बचावकार्यात अत्याधुनिक ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आल्यामुळे नेमक्या कोणत्या मजल्यावर नागरिक अडकले आहेत, हे शोधणे सोपे झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी 9 व्या ते 17 व्या मजल्यापर्यंतच्या अनेक फ्लॅट्समधील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संकटसमयी प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः रात्री घटनास्थळी उपस्थित राहून धीर दिल्याबद्दल सर्व रहिवाशांनी प्रशासनाचे व नेत्यांचे मनापासून आभार मानले आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button