Nashik News : मुकणे धरणात पोहण्यासाठी गेलेले दोघे बेपत्ता; शोधमोहीम सुरूच, इगतपुरीत हळहळ

Nashik News : इगतपुरी : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात पोहण्यासाठी गेलेले दोन जण बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिल भागुजी भदादे (वय ४९) आणि तुकाराम दामू येले (वय ४७) अशी बेपत्ता व्यक्तींची नावे आहेत. गुरुवारी दुपारपासून त्यांचा शोध सुरू असून, शुक्रवारी दिवसभर शोधमोहीम राबवूनही दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही. या घटनेमुळे सांजेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.https://maharashtramirror.com/ Nashik news
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अनिल भदादे आणि तुकाराम येले हे दोघे मुकणे धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. यावेळी धरणाच्या काठावर त्यांचे कपडे आणि वैयक्तिक वस्तू आढळून आल्याने ते पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर वाडीवऱ्हे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच आमदार हिरामन खोसकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधमोहिमेचा आढावा घेतला. तसेच संबंधित यंत्रणांना शोधकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक नागरिक, पोलीस कर्मचारी आणि अनुभवी पाणबुड्यांच्या मदतीने धरणात शोधमोहीम राबवण्यात आली.
शुक्रवारी दिवसभर अथक प्रयत्न करूनही दोघांचा शोध लागला नाही. अंधार पडल्याने सुरक्षेच्या कारणास्तव शोधमोहीम थांबवण्यात आली. दिवाळीच्या सणात घडलेल्या या घटनेमुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोघांचा लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

