Pune News : वारजेत कचरा गाड्यांच्या वापराबाबत तक्रार
Pune News : नियमित गाड्या हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी वळवल्याचा आरोप; वाहनांच्या मार्गांसह आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : वारजे येथील प्रभाग क्रमांक ३२ मधील नियमित कचरा संकलनासाठी असलेल्या गाड्या हॉटेलमधील कचरा उचलण्यासाठी वापरल्या जात असल्याचा आरोप जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश किसन माझिरे यांनी केला आहे. याप्रकरणी एस. आय. सचिन सावंत यांच्या कार्यपद्धतीची निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तांकडे केली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
माझिरे यांनी १४ ऑक्टोबर रोजी याबाबत लेखी तक्रार दिली आहे. प्रभागातील नियमित कचरा संकलनासाठी असलेल्या गाड्या हॉटेलमधील कचरा उचलण्यासाठी वळवल्याने नागरिकांचा कचरा उचलण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी वारंवार प्राप्त होत असल्याचे अर्जात म्हटले आहे. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा साचून नागरिकांना अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
आर्थिक मोबदल्याच्या आरोपाची चौकशी करा
हॉटेल व्यावसायिकांकडून आर्थिक मोबदला घेतला जात असल्याच्या तक्रारी असल्याचा गंभीर आरोपही माझिरे यांनी अर्जात केला आहे. या आरोपाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, या आरोपासंदर्भातील कोणताही पुरावा तक्रार अर्जात नमूद करण्यात आलेला नाही.
प्रभाग क्रमांक ३२ मधील कचरा संकलनासाठी असलेल्या काही गाड्या इतर प्रभागांत पाठवून हॉटेलमधील कचरा संकलनासाठी वापरल्या जात असल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे प्रभागातील नियमित कचरा संकलन व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे माझिरे यांनी म्हटले आहे.
वाहनांचे मार्ग, नोंदी तपासण्याची मागणी
संबंधित वाहनांचे मार्ग, कचरा संकलनाच्या नोंदी आणि कथित आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत दोष आढळल्यास एस. आय. सचिन सावंत यांच्यावर नियमानुसार कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ३२ मधील नागरिकांना नियमित आणि वेळेवर कचरा संकलनाची सुविधा मिळावी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही तक्रार अर्जात म्हटले आहे.


