
Ashish Shelar on Thackeray Brother : भावनिक आवाहनाने निवडणुका जिंकता येत नाहीत; बावनकुळे आणि आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना घेरले
मुंबई | उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी केलेल्या युतीच्या घोषणेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या युतीवर भारतीय जनता पक्षाने अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली असून, “आम्ही काय लंडनमधून आलो आहोत का?” असा सवाल करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या कार्डवर पलटवार केला आहे. तर आशिष शेलार यांनी जुन्या भाषणांची आठवण करून देत कवितेच्या माध्यमातून राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
‘विकसित मुंबई’ फक्त फडणवीस करू शकतात: बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवमध्ये बोलताना ठाकरे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “आम्ही सगळेच मराठी आहोत, काय लंडनमधून आलो आहोत का? महायुतीत सर्वच मराठी आहेत. फक्त भावनिक आवाहन करून आता चालणार नाही, कारण मुंबईतील जनता सुजाण आहे.”
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली असून त्यांनी हिंदुत्व सोडले आहे. त्यांच्या उमेदवारांच्या विजयानंतर पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात, हे दुर्दैवी आहे.”पायाखालची जमीन सरकल्यामुळेच हे दोन्ही नेते आता एकत्र आले आहेत, मात्र त्यांना यश मिळणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
आशिष शेलारांचा कवितेतून ‘बाण’; राज ठाकरेंना धरले आरसा
भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंनी शिवसेना सोडताना केलेल्या विधानांची आठवण करून दिली. शेलार यांनी कवितेतून विचारले,
“घेरलं होतं मातोश्रीवरील “विठ्ठलाला” बडव्यांनी..
तुमच्या मते, पक्षाचा ताबा घेतला होता चार कारकुनांनी…
एवढ्या मोठ्या संघटनेला संपवण्यात तुम्हाला व्हायचे नव्हते “भागीदार”
सगळ्या पदांचे राजीनामे देत भाषण केले होते खुमासदार !
आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार का?
त्यांच्यासोबत बेमालूमपणे भागीदार होणार का?
“लाव रे तो व्हिडीओ” असे आता मुंबईकर म्हणतील
तुमची जुनी भाषणे काढून आरसा समोर धरतील!
तुमचा चेहरा बघून तुम्हाला भीती नाही ना वाटणार?
एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार?
मुंबईकर गल्लोगल्लीत तुम्हाला विचारणार…
“नेमके कशासाठी झाला होतात त्यावेळी वेगळे?”
“नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?”
असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महायुती विरूद्ध ‘ठाकरे’ सामना रंगणार
राज ठाकरे यांनी “मुंबईचा महापौर मराठीच होणार” असे ठणकावून सांगितल्यानंतर, भाजपने त्याला विकास आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुंबईचा विकास करू शकतात, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे मुंबई महापालिकेचे रणकंदन आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहे.
