
Gas Induction out off Stock : किंमतीत 10 ते 20 टक्क्यांची वाढ; सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांचा इलेक्ट्रिक कुकिंगकडे कल
मुंबई :- देशात निर्माण झालेल्या एलपीजी (LPG) गॅसच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील गणिते बिघडली आहेत. सिलेंडर बुकिंग करूनही वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांनी आता ‘बॅकअप’ म्हणून इंडक्शन कुकटॉप खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ब्लिंकिट यांसारख्या प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर इंडक्शनची मागणी अचानक वाढली असून अनेक ब्रँड्स ‘आउट ऑफ स्टॉक’ झाले आहेत.
ऑनलाइन मार्केटमध्ये इंडक्शन मिळेनासे!
मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये आहे. याच कारणामुळे दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई यांसारख्या महानगरांमध्ये इंडक्शन कुकटॉपची विक्री विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
अमेझॉन: येथे इंडक्शनच्या विक्रीत तब्बल 30 पट वाढ झाली आहे.
फ्लिपकार्ट: विक्रीत चार पटीने वाढ नोंदवण्यात आली आहे.
ब्लिंकिट: या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तर बहुतांश मॉडेल्स पूर्णपणे संपले आहेत.
किंमतीत 10-20% वाढ
मागणी वाढल्याचा थेट परिणाम किंमतींवर झाला आहे. सामान्यतः ₹1,300 ते ₹2,000 मध्ये मिळणारे बेसिक इंडक्शन आता महाग झाले असून, लोकप्रिय ब्रँड्सच्या मॉडेल्सच्या किंमती 10 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. केवळ इंडक्शनच नव्हे, तर इलेक्ट्रिक केटल, राइस कुकर आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांची मागणीही 3 ते 4 पटीने वाढल्याचे क्रोमा आणि स्टोव्हक्राफ्ट यांसारख्या रिटेलर्सनी सांगितले आहे.
सरकारचे आश्वासन: “घाबरू नका!”
वाढत्या घबराटीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, देशाचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे.
पुरवठा सामान्य: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती एलपीजीचा पुरवठा विस्कळीत झालेला नाही.
डिलिव्हरी वेळ: सिलेंडर बुकिंग केल्यानंतर सरासरी अडीच दिवसांत त्याची डिलिव्हरी केली जात आहे.
उत्पादन वाढवले: मागणी पूर्ण करण्यासाठी एलपीजीचे उत्पादनही वाढवण्यात आले असून नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडून साठेबाजी करू नये, असे आवाहन सरकारने केले आहे.
