Navi Mumbai News : कौटुंबिक वादातून सानपाडा पोलिसाची आत्महत्या

• पत्नीशी फोनवर बोलताना टोकाचे पाऊल उचलले, उलवा येथील राहत्या घरात गळफास
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस दलात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या दुर्दैवी घटनांची मालिका सुरूच आहे. रबाळे येथील एका पोलीस शिपायाची घटना ताजी असतानाच, आता सानपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वप्नील लोहार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.
नेमके काय घडले?
स्वप्नील लोहार (वय अंदाजे 35) हे सानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. ते उलवा येथे आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते. त्यांची पत्नी आणि मुलगा काही दिवसांपूर्वी गावी गेले असल्याने ते घरात एकटेच होते.
गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास स्वप्नील यांचे त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलणे झाले. याचवेळी काही कौटुंबिक वादातून त्यांनी रागाच्या भरात ‘मी आत्महत्या करतो’ असे म्हटले. घाबरलेल्या पत्नीने तात्काळ ही बाब स्वप्नील यांच्या एका सहकाऱ्याला फोन करून सांगितली.
सहकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांचा तपास
सहकाऱ्याकडून माहिती मिळताच, उलवा पोलिसांनी तात्काळ स्वप्नील यांच्या राहत्या घरी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी तो तोडला आणि आत प्रवेश केला. त्यावेळी स्वप्नील लोहार गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
या घटनेची नोंद उलवा पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कौटुंबिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे नवी मुंबई पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
