
Mumbai Gas Cylinder News : इराण-इस्रायल युद्धाचा फटका; व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा थांबवल्याने हॉटेल उद्योग संकटात, घरगुती गॅसबाबतही धाकधूक
मुंबई :- इराण आणि इस्रायलमधील युद्धाचे पडसाद आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरात आणि हॉटेल उद्योगात उमटू लागले आहेत. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक (Commercial) एलपीजी सिलिंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील सुमारे 20% हॉटेल्स आज बंद ठेवण्यात आली असून, पुढील तीन दिवसांत ही स्थिती न सुधारल्यास 59% हॉटेल्स बंद होण्याची भीती ‘आहार’ (AHAR) संघटनेने व्यक्त केली आहे.
“सरकारने सभागृहात सत्य मांडावे” – सतेज पाटील
काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या संकटावरून सरकारवर सडकून टीका केली आहे. “व्यावसायिक गॅसवर निर्बंध आलेत, आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता आहे. पुन्हा चूल पेटवायची वेळ येणार का? असा प्रश्न जनतेसमोर आहे. ऑईल कंपन्यांकडे कच्चा मालच नसेल तर उत्पादन कसे वाढणार? हे सर्व चुकीच्या परराष्ट्र धोरणाचे परिणाम आहेत,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकारने सभागृहात गॅसच्या नेमक्या स्थितीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हॉटेल आणि मिठाई व्यवसायाला मोठा फटका
मुंबईची स्थिती: ‘आहार’ संघटनेच्या माहितीनुसार, मुंबईतील अनेक हॉटेल्सकडे आज आणि उद्या पुरेल इतकाच गॅस साठा आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास निम्मी हॉटेल्स बंद होतील, ज्याचा फटका तिथे काम करणाऱ्या हजारो कामगारांना बसेल.
पुण्यातील चित्र: प्रसिद्ध ‘काका हलवाई’ मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी सांगितले की, गॅसअभावी आता डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय शोधावा लागत आहे. यामुळे मिठाईच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारचा ‘पॅनिक’ रोखण्याचा प्रयत्न?
एकीकडे सरकार परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत असले, तरी प्रशासकीय पातळीवर ऑईल कंपन्यांकडून तातडीने माहिती मागवली जात आहे. घरगुती ग्राहकांमध्ये भीती पसरू नये म्हणून सरकारने गॅस बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 25 दिवसांवर नेला आहे. मात्र, मध्यमवर्गीयांना आगामी 8-10 दिवसांत महागाई आणि तुटवड्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
