क्राईम न्यूजपुणेमहाराष्ट्र

पुन्हा नवले पुल…

भरधाव ट्रकने पिकअपला उडवले, इंदापूरच्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुणे: मुंबई-बेंगलोर महामार्गावर नऱ्हे येथील नवले पुलाच्या चढावर एका भरधाव ट्रकने पिकअप गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिकअप चालक तरुण गंभीर जखमी झाला असून, उपचारापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (ता. ४) सकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेल पिंगारासमोर ही घटना घडली.

महादेव उत्तम शेंडे (वय २२, रा. वरकुटे खुर्द, शेंडे वस्ती, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र सुमित कांबळे (वय २०, रा. वरकुटे खुर्द, ता. इंदापूर) याने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक सुधाकर विश्वनाथ बडे (वय ३९, रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे.

ट्रकची पाठीमागून भीषण धडक
मिळालेल्या माहितीनुसार, मयत महादेव शेंडे हा आपल्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी घेऊन महामार्गावरून जात होता. नऱ्हे गावच्या हद्दीत नवले पुलाच्या सुरुवातीला असलेल्या चढावर तो आला असता, पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने (क्रमांक दिलेला नाही) त्याला जोरात धडक दिली. ट्रक चालक सुधाकर बडे हा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन अतिशय वेगात आणि हयगयीने चालवत होता.

इंदापूरचा तरुण दगावला
या धडकेत पिकअप गाडीचे मोठे नुकसान झाले असून महादेव शेंडे याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र जखमा गंभीर असल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.

नऱ्हे पोलिसांनी ट्रक चालकावर भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, ३२४ आणि मोटार वाहन कायदा कलम १३४, १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button