फुरसुंगीत झालेल्या खुनातील ३ संशयित ५ तासांत अटकेत

सराईत गुन्हेगार आकाश उर्फ राणा मोहन कांबळे याच्यावर सहा जणांनी हल्ला करून त्याचा खून केला होता
पुणे: फुरसुंगी परिसरात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक २ ने अवघ्या ५ तासांत अटक केली आहे.

दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुपीनगर, फुरसुंगी येथे रेकॉर्डवरील आरोपी आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २५) याच्यावर सहा जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून केला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०३(१), ३५२, १८९(२), १८९(४), ३(५), आर्म अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलीस अंमलदारांना गोपनीय माहिती मिळाली की, या खुनातील मुख्य आरोपी मस्तानी तलाव परिसरात लपून बसले आहेत. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपींना पकडण्यासाठी कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना जागीच पकडले.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार उर्फ ओम प्रमोद मोरे (वय २३, रा. हडपसर), आदित्य ज्ञानेश्वर पिंपळेकर (वय २०, रा. हडपसर) आणि अरुण अनिल यादव (वय २०, रा. शेवाळवाडी, हडपसर) हे आहेत.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आरोपी अरुण यादव याला यापूर्वीच दोन वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
सदर सर्व आरोपींना पुढील तपासासाठी फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) विवेक मासाळ, तसेच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खंडणी विरोधी पथक २ चे पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्यासह पोलीस कर्मचारी सुरेंद्र जगदाळे, नितीन मुंढे, कुसाळकर, अमोल घावटे आणि पवन भोसले यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
3 suspects in Fursungit murder arrested within 5 hours


