पुण्यात बनावट सोने तारण ठेवून ४.२३ कोटींचा घोटाळा

व्हॅल्युअर म्हणून काम पाहणाऱ्या दोन भावांचा प्रताप
पुणे: पुण्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या हिंगणे शाखेत मोठा गोल्ड लोन घोटाळा उघडकीस आला आहे. वडिलांच्या निधनानंतर अधिकृत व्हॅल्युअर म्हणून काम पाहणाऱ्या मोक्ष हिम्मतलाल जैन आणि चिराग हिम्मतलाल जैन यांनी १३ कर्जदारांशी संगनमत करून बनावट व कमी शुद्धतेचे सोने तारण ठेवून बँकेची तब्बल ४ कोटी २३ लाख ४ हजार ७५२ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी स्टेट बँकेच्या हिंगणे शाखेचे व्यवस्थापक मनोजकुमार (वय ४३) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोक्ष हिम्मतलाल जैन, चिराग हिम्मतलाल जैन (रा. शनिवार पेठ) यांच्यासह १३ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांचे वडील अनेक वर्षे व्हॅल्युअर म्हणून बँकेचे काम करत होते
पोलिसांच्या माहितीनुसार, हिम्मतलाल जैन हे अनेक वर्षे बँकेसाठी अधिकृत सराफ व व्हॅल्युअर म्हणून काम करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुले मोक्ष आणि चिराग यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बनावट दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्याने संबंधित कर्जदारांना तब्बल ४.४४ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.
कर्जदारांनी हप्ते थकवले
सुरुवातीला काही हप्ते भरल्यानंतर कर्जदारांनी हप्ते थकवले. नोटीस पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्याने बँकेला संशय आला. त्यानंतर नवीन सराफाकडून तपासणी करण्यात आली असता तारण ठेवलेले सोने बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली असून, आता पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिपाली भुजबळ करीत आहेत.
पुणे क्राईम न्यूज


