जुन्नरमध्ये दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह तिघांना अटक

गुन्ह्यात वापरलेली एक ‘अर्टिगा’ कार, असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे: जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह तीन तरुणांना अटक केली आहे. आरोपींकडून शस्त्रास्त्रांसह गुन्ह्यात वापरलेली एक ‘अर्टिगा’ कार, असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २०) दुपारी पावणेचारच्या सुमारास निमगाव सावा येथील कारफाटा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार संदीप रामचंद्र वारे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राहुल ऊर्फ बाल्या सुरेश साळवे (वय २४, रा. साकोरी, ता. जुन्नर), तेजस ऊर्फ लाल्या संदीप मातेले (वय २१, रा. नारायणगाव) आणि दर्पण सुदेश पवार (वय २२, रा. नारायणगाव) या तिघांना ताब्यात घेतले आहे. आरोपी निमगाव सावा हद्दीतील कारफाटा येथे बेकायदेशीर शस्त्रांसह येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली.
संशयास्पदरित्या आलेल्या एका ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी अर्टिगा कारची (MH 06 BE 4626) झडती घेतली असता, आरोपींच्या ताब्यात ७० हजार रुपये किमतीची दोन गावठी पिस्तूल आणि २ हजार रुपयांची दोन जिवंत काडतूस मिळून आली. पोलिसांनी ५ लाख रुपयांची कार आणि ही शस्त्रास्त्रे असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हे तरुण ही शस्त्रे कोठून आणली आणि त्याचा वापर कशासाठी करणार होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
नारायणगाव पोलिसांनी याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेटे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामीण भागातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे.
Three arrested with two village pistols and live cartridges in Junnar


