Pune Crime : गणेश विसर्जन मिरवणुकीत अवैध मद्यविक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका; पुण्यात ६४ गुन्हे दाखल, ६२ जण अटकेत
Pune Crime : पुणे, महाराष्ट्र मिरर : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात घोषित करण्यात आलेल्या ‘ड्राय डे’चा (दारूमुक्त दिवस) नियम धाब्यावर बसवून छुप्या पद्धतीने अवैध मद्यविक्री आणि मद्यनिर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ६४ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ६२ जणांना अटक करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग १ चे अधीक्षक अतुल कानडे आणि विभाग २ चे अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि अवैध मद्यसाठ्याची वाहतूक रोखण्यासाठी विभागाची विशेष पथके संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पुणे शहरात ३९ गुन्हे दाखल
पुणे शहरात उत्पादन शुल्क पथकांनी मार्केट यार्ड, स्वारगेट, लक्ष्मीनगर, गुलटेकडी, पौड फाटा, धायरी आणि नऱ्हे आदी भागांत छापे टाकले. या कारवाईदरम्यान एकूण ३९ गुन्हे नोंदवून ३८ संशयितांना अटक करण्यात आली. या मोहिमेत ७१ लिटर देशी दारू, १५१.४७ लिटर विदेशी मद्य (आयएमएफ एल), ४१.७८ लिटर परदेशी मद्य, २४.६५ लिटर बीअर आणि ८ लिटर ताडी हस्तगत करण्यात आली. तसेच अवैध वाहतुकीसाठी वापरलेली ५ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
पिंपरी-चिंचवड व मावळमध्ये २५ गुन्हे दाखल
पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरामध्ये ताथवडे, रामनगर, बालाजीनगर, भीमशक्तीनगर, दिघी बसस्टॉप परिसर, डोंगरगाव आणि सणसवाडी भागात छापेसत्र राबवण्यात आले. या भागात २५ गुन्हे दाखल करून २४ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. पथकाने या कारवाईत तब्बल ३,१०० लिटर रसायन (मद्यनिर्मितीसाठी लागणारे), १८० लिटर गावठी दारू, २१९.३७ बल्क लिटर देशी दारू, १९.५८ बल्क लिटर विदेशी दारू आणि ७०.६७ बल्क लिटर बिअरचा साठा जप्त केला. याशिवाय एक चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले.
१४.३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या संपूर्ण धडक कारवाईत एकूण १४ लाख ३१ हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कठोर कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


