Jalana News : मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना; अंतरवाली सराटीतून ताफा निघाला, सुरक्षेत मोठी वाढ
Jalana News जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. बुधवारी सकाळी आरोग्य तपासणी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेत तसेच गावातील दोन मंदिरांत दर्शन घेऊन त्यांनी मोजक्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे प्रस्थान केले. जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, त्यांच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ jalana news
जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वीच १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होण्याची घोषणा केली होती. तसेच १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आणि आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आझाद मैदान पोलिसांनी उपोषणाला परवानगी मिळावी यासाठी केलेले अर्ज दोन वेळा फेटाळले आहेत. तिसऱ्यांदा जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे अर्ज केला असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, परवानगीच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता त्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे.https://maharashtramirror.com/ jalana News
जरांगेंच्या सुरक्षेत मोठी वाढ
मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना विशेष सुरक्षा विभागाच्या (SPU) माध्यमातून सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असून, एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस कर्मचारी सतत त्यांच्या सोबत राहणार आहेत. अंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे.
जरांगे पाटील यांच्या ताफ्यात डिफेंडर आणि फॉर्च्युनर अशी दोन वाहने असून, त्यासोबत दोन रुग्णवाहिकाही आहेत. जालना पोलिसांचे दोन अंगरक्षक तसेच छत्रपती संभाजीनगर येथील अतिरिक्त SPUचे सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
६४८ पोलिसांचा कडक बंदोबस्त
जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटी ते शहागड मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये तीन उपविभागीय पोलिस अधिकारी, १० पोलिस निरीक्षक, ३० सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ३०० पोलिस अंमलदार, २६५ होमगार्ड आणि आरसीपीच्या दोन प्लाटूनचा समावेश आहे. एकूण ६४८ पोलिसांचा फौजफाटा या मार्गावर तैनात करण्यात आला आहे.
अंतरवाली सराटी, वडीगोद्री, धुळे-सोलापूर महामार्गावरील डावा कालवा, वडीगोद्री टी-पॉईंट उड्डाणपूल, राजस्थानी हॉटेल, गहिनीनाथ नगर, महाकाळा, अंकुशनगर आणि पैठण फाटा (शहागड) या प्रमुख ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मोजके सहकारी ताफ्यात
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत श्रीराम कुरणकर, सरपंच पांडुरंग तारख, बद्रीनाथ तारख, स्वप्निल तारख, संजय कटारे, गंगाधर काळकुटे, किशोर बलांडे आणि गणेश काळे हे सहकारी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघताच अंतरवाली सराटीत उपस्थित हजारो समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना निरोप दिला. “आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं”, “आता कुठं जायचं? मुंबईला जायचं!”, “एक मराठा, लाख मराठा” आणि “लढेंगे, जितेंगे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आझाद मैदानावरील आंदोलनाकडे लक्ष
मुंबईतील आझाद मैदानावर होणारे हे मनोज जरांगे पाटील यांचे १२ वे उपोषण ठरणार आहे. जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर आता राज्य सरकार आणि प्रशासन कोणती भूमिका घेणार, तसेच आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

