निगडी प्राधिकरणात केबलने घेतला महिलेचा बळी

नागरिकांनी केला प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध
पिंपरी: वीस दिवसांपूर्वी वडिलांच्या अपघातात मृत्यू झालेल्या संपदा पटवर्धन यांच्या कुटुंबावर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातील एकुलती एक मुलगी असलेल्या संपदा यांचा केबलच्या जाळ्यात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना निगडी प्राधिकरण परिसरात घडली.

संपदा पटवर्धन (वय ४०) या साहित्य क्षेत्रात कार्यरत होत्या. शनिवारी सकाळी संपदा दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबलमध्ये त्यांचा गळा अडकला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे त्या खाली कोसळल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
प्राधिकरण परिसरात हरित सेतू प्रकल्पामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे केबलचे जाळे नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवला.
केबल धोरण कागदावरच
महापालिकेने केबल टाकण्यासाठी धोरण तयार केले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनधिकृत केबलमुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होतोच, पण सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाने नियम केले असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या वायर दिसत आहेत. एप्रिल २०२६ मध्ये काही कारवाया करण्यात आल्या; मात्र त्या अपुऱ्या ठरत आहेत.
Cable kills woman in Nigdi Authority


