
Navi Mumbai Latest News : सुशिलकुमार शर्मासह झारखंडच्या टोळीने रचलं होतं वेश्याव्यवसायाचं जाळं; बनावट ग्राहकाच्या जाळ्यात अडकले नराधम
नवी मुंबई :- नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यात म्हणजेच तुर्भे एमआयडीसीच्या गजबजलेल्या वातावरणात, ‘अश्वी लॉजिंग’च्या बंद दारांआड एक भयंकर आणि अनैतिक खेळ सुरू होता. वरून शांत दिसणाऱ्या या हॉटेलमध्ये छुप्या मार्गाने देहविक्रयाचा बाजार मांडला जात असल्याची पक्की खबर गुन्हे शाखेच्या हाती लागली होती. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने या नरकाचा उभा छेद घेण्याचे ठरवले आणि सुरू झाला एक थरारक ‘ट्रॅप’.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी रचलेल्या चक्रव्यूहाचा पहिला भाग म्हणून एका जिगरबाज पोलिसाला ‘बनावट ग्राहक’ बनवून हॉटेलमध्ये पाठवण्यात आले. तो पोलीस कर्मचारी जेव्हा हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचला, तेव्हा तिथे उभ्या असलेल्या 36 वर्षीय मॅनेजर सुशिलकुमार नरेश शर्मा याने त्याला कोणत्याही भीतीशिवाय मोबाईलमधील काही महिलांचे फोटो दाखवले. एका महिलेला पसंत करण्यासाठी 4500 रुपयांची बोली लावून सौदा पक्का करण्यात आला. मॅनेजर सुशिलकुमारच्या तालावर नाचणारा वेटर उपेंद्रकुमार घमाडी यादव याने त्या बनावट ग्राहकाला वरच्या मजल्यावरील एका खोलीत नेले आणि तिथे दोन पीडित महिलांना समोर उभे केले. पैशांचे पाकीट उपेंद्रकुमारच्या हातात पडताच आणि तिसरा साथीदार छोननकुमार पेमन यादव याने संमती दर्शवताच, ठरलेल्या संकेतानुसार बनावट ग्राहकाने आपल्या पथकाला इशारा केला.
बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न लावता हॉटेलवर झडप घातली. पोलिसांची एन्ट्री होताच हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. सुशिलकुमार शर्मा, उपेंद्रकुमार यादव आणि छोननकुमार यादव या तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना जागीच झडप घालून बेड्या ठोकल्या. या कारवाईत दोन असहाय्य महिलांची सुटका करण्यात आली, ज्यांना पैशांचे आमिष दाखवून झारखंडमधून आणलेल्या या टोळीने वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलले होते. झारखंडच्या पलामू आणि छत्रा जिल्ह्यातून आलेल्या या तीन नराधमांनी नवी मुंबईला आपले केंद्र बनवून हा काळा धंदा सुरू केला होता. सध्या या तिन्ही आरोपींना 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या गुन्ह्याची पाळेमुळे आणखी कुठे पसरली आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.
