MUMBAI NEWS: महायुतीची अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत, रवींद्र चव्हाण यांचे आवाहन
महत्वाचे मुद्दे
- विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद
- ४ जूनपर्यंत बंडखोरांना समजावण्याचे प्रयत्न सुरू
मुंबई: महाराष्ट्रात आगामी १८ जून रोजी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी निर्माण झालेली बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली आहे. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी एकत्र येत आज मुंबईत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करत, ज्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात जाऊन बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत, अशी विनंती केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, “आगामी १८ जून रोजी १६ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होत असून, नागपूरच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अतिशय उत्तम काम करत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. या सर्व निवडणुका महायुती म्हणून पूर्ण ताकदीने लढवल्या जातील आणि सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १ जून रोजी सर्व उमेदवारांनी अर्ज भरले असून, ४ जून ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे बंडखोरांनी वेळेत माघार घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.”MUMBAI NEWS
नागपूरच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक
या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकजूट राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उमेदवारांची ही नावे अंतिम करण्यात आली. यामध्ये नागपूरच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून उर्वरित १६ जागांवर नियमित निवडणूक होत आहे. महायुतीच्या अधिकृत यादीत नागपूर मतदारसंघातून डॉ. राजीव भास्करराव पोतदार, भंडारा-गोंदियातून अविनाश आनंदराव ब्राह्मणकर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून अरुण हनुमंत लखानी, अमरावतीमधून प्रवीण रामचंद्र पोटे, सोलापूरमधून राजेंद्र विठ्ठल राऊत आणि अहमदनगरमधून प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन
तसेच जळगावमधून नंदकिशोर भागवत महाजन, सांगली-साताऱ्यातून धैर्यशील ज्ञानदेव कदम, नांदेडमधून अमरनाथ अनंतराव राजूरकर, उस्मानाबाद-लातूर-बीडमधून बसवराज माधवराव पाटील, औरंगाबाद-जालन्यातून सुहास त्र्यंबकराव शिरसाठ आणि ठाण्यातून रवींद्र सदानंद फाटक निवडणूक लढवणार आहेत. यवतमाळमधून दुष्यंत सतीश चतुर्वेदी, परभणी-हिंगोलीतून सईद शेरगुल खान, नाशिकमधून नरेंद्र भिकाजी दराडे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून अनिकेत सुनील तटकरे आणि पुण्यामधून विक्रम संजय काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन निवडून आणण्याचे आवाहन महायुतीच्या नेत्यांनी केले आहे.MUMBAI NEWS
महायुतीमधील एकजूट अधोरेखित
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी देखील यावेळी महायुतीमधील एकजूट अधोरेखित केली. ते म्हणाले की, जागावाटपाबाबत काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. ज्या पक्षाची ताकद आणि जागा अधिक आहेत, त्यानुसारच उमेदवारीचे वाटप अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आले आहे. देशात आणि राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत ठेवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. बंडखोरांचे अर्ज मागे घेण्याची अधिकृत मुदत उद्या असली तरी, आजपासूनच त्यांना समजावून सांगण्याची आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
बंडखोरांच्या पक्षकार्याचा योग्य सन्मान केला जाईल: राहुल शेवाळे
शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी बंडखोर उमेदवारांना आश्वस्त करताना सांगितले की, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून सर्व १७ जागांवर महायुतीचाच विजय होईल. शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त इतर अर्ज भरलेल्या सर्व अपक्ष व बंडखोर उमेदवारांशी स्वतः संपर्क साधून सविस्तर चर्चा केली आहे. ज्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी पक्षाच्या हितासाठी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे, त्यांच्या पक्षकार्याचा आणि त्यागाचा भविष्यात नक्कीच योग्य सन्मान केला जाईल, अशी ग्वाही शेवाळे यांनी यावेळी दिली.MUMBAI NEWS
सर्व १७ जागा जिंकण्याचा महायुतीचा निर्धार
महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीनुसार आता बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसमोर आहे. काल झालेल्या समन्वय बैठकीत सर्व नेत्यांना आपापल्या भागातील बंड शमवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्या ४ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नेमके किती बंडखोर उमेदवार आपले अर्ज मागे घेतात आणि महायुतीची एकी टिकवून ठेवतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय लक्ष लागले आहे.
MUMBAI NEWS
